About me

Showing posts with label Social Issues. Show all posts
Showing posts with label Social Issues. Show all posts

Sunday, 19 July 2020

“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३)

सूत्रसंचालक:  मा. मदने सर, आपण येथे योग्य मार्गदर्शन केलेले आहे. आपल्या मार्गदर्शनातून दिसत आहे की जो युवक वर्ग आहे त्याला विचारधारेची पारख करण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हाच आपला संदेश आहे असं मला दिसते. इथे मी डॉक्टर माने सरांना पुढचा प्रश्न विचारू इच्छितो, जसं गांधीवादी, गोळवळकर वादी विचारधारा बाहेरून दिसताना आपल्याला वेगवेगळ्या दिसतात, असं वाटतं की गांधीवादी विचारधारा वेगळी आहे आणि गोळवळकर वादी विचारधारा वेगळी आहे, परंतु त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशाच या दोन बाजूचे प्रवाह राजनीतीमध्ये पण आहेत, आणि आमच्या भटक्या विमुक्त समाजाचा जो युवावर्ग आहे तर ह्या युवा वर्गाचा वापर हे राजनीतीमध्ये कसा करतात आणि त्याच्या पासून जर समाजाला बाहेर काढायच असेल तर त्यांनी मग फुले शाहू आंबेडकरवादी विचारांकडे गेले पाहिजे याबद्दल आपण मार्गदर्शन करावे. 

डॉ. विजय माने: सर, एकदम बरोबर बोललात, आपल्याला कोणताही प्रश्न असेल किंवा कोणतीही समस्या असेल तर ते संविधानामुळे सुटणार आहे. कारण संविधानामध्ये समानता आहे आणि आपले हक्क आहेत. आपल्याला आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे, आणि आपला भटका समाज हा पूर्णतः अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांच्यात अडकलेला आहे. यापुढे जाऊन मी असं सांगेन जर आपल्याला आपला नेता निवडायचा असेल तर तो नेता आपल्या समाजासाठी किती सॅक्रिफाइस करेल, एखादा नेता हा जाती पुरताच मर्यादित राहतो, एखाद्या जातीतून एखादा नेता येतो आणि पक्ष त्याला पुढे उचलतात. तो नेता त्या जाती पुरताच मर्यादित राहतो. ओबीसी जातीच्या खूप सार्‍या संघटना आहेत, त्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आपण खूप वर्षापासून पाहत आहे की एखादा पक्ष हा एखाद्या जातीच्या समूहाला वापरून घेत असतो, तसेच एकदा का आपले काम झाले की तो पक्ष त्या जातीच्या नेत्याला आणि जातीला कसं बाहेर टाकतो हे आपल्याला उदाहरणासहित माहित आहे. 

सूत्रसंचालक:  डॉ. विजय माने सिरांनी जी मांडणी केलेली आहे कि आमच्या समाजाचे जे लोक आहेत ते जातीजातीमध्ये विखुरलेले आहेत, तसेच प्रत्येक जातीचा कोणता ना कोणता राजनीतिक पक्ष वापर करतो, आणि त्याचा वापर झाल्यानंतर त्याला फेकून देतो, याला आपण म्हणतो युज आणि थ्रू strategy आहे. आमच्या समाजाला फेकून दिल्यानंतर त्याला कळतं की आमचा वापर झालेला आहे, परंतु त्याला वापरल जात असतं, तेव्हा तो अभिमान बाळगत असतो की बघा मी कसा काय पुढे आहे. हि जी भावना आहे ती आमच्या समाजाला लक्षात घ्यावी लागेल, आमचं संघटन जरी छोट असेल, घर छोट असेल, तरी दुसऱ्यांच्या काचेच्या महालात जाऊन आमचा उद्धार होणार नाही. सर, आपणही सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. मी मा. उल्हास राठोड सरांकडे येतो, सर, ओबीसी समाजाचे जसे प्रश्न आहेत की त्यांची जातिगत जनगणना झाली पाहिजे, ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. तर हा जो प्रतिनिधित्वाचा मामला आहे तो एक गहन मामला आहे, आणि हा सोडवण्यासाठी जो भटके-विमुक्त समाजामध्ये इंटेलेक्चुअल फोरम आहे मंग या इंटेलेक्चुअल समुदायाने वरच्या समूहाशी समायोजन करण्यासाठी काय करावे लागेल, आणि त्याच बरोबर ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेतील भटका विमुक्त हा भागच नाही आहे, आणि या समूहाच आत्ता ब्राह्मणीकरण करण्याचं काम सुरू आहे तर यातील नेमकी सभ्यता कोणती? 

मा. उल्हास राठोड: खरंतर जनगणना होन सर्व समाजाच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी भागीदारी म्हणतात ते खर आहे, म्हणून तर सत्यशोधक ओबीसी परिषद गेले वीस पंचवीस वर्ष सर्व जातींची जनगणना करण्याचे आंदोलन चालवलेल होतं. इथली जी शासन व्यवस्था आहे आणि ती मनुवाद्यांच्या हातामध्ये असल्यामुळे, मंडल आयोगापासून आम्हाला 27 टक्क्यांवर ठेवलेला आहे हे आपल्या सर्वांना विधीत आहे. अस आहे की, आमचे ओबीसी, भटक्या विमुक्तांसह सर्वच जेव्हा मंडल आयोग चालू होतं, तेव्हा फक्त मूठभर लोक आंदोलन करत होते, प्रकाश आंबेडकर, श्रावण देवरे, जनार्दन पाटील ही काही मंडळी होती, आम्ही त्यावेळी आंदोलन करत होतो आणि आमचा ओबीसी समाज राम मंदिर बांधण्यासाठी आयोध्याला गेलेला होता. तो सर्व काही गमावून बसला. जनगणना सर्वांचीच झाली पाहिजे, पण मुद्दा असा आहे की ह्या विचारांपर्यंत तो कसा येणार, माझी अस्मिता काय आहे, माझे संविधानिक अधिकार काय आहेत, आणि ते मला कसे मिळवता येतील. संविधान खरंच माझ्यासाठी राष्ट्रीय ग्रंथ आहे का, माझ्या कल्याणाचा ग्रंथ आहे का, याची ओळख सुद्धा आमच्या वर्गाला नसल्यामुळे हि आमची दुरावस्था झालेली आहे. आताशी आम्हाला संविधान कळायला लागलेलं आहे, पण संविधानातील विचार माझ्या कल्याणासाठी आहेत ते कळत नाहीये याचं कारण आहे सांस्कृतिक बदल. मनुवादी विचारसरणी आहे आणि संविधानिक विचारसरणी आहे यामध्ये ची फारकत आहे या फारकती मुळे या दोन्ही विचारांचा मेळ होत नाही, म्हणून आमचा ओबीसी किंवा भटका विमुक्त संविधान मान्य करत नाही. ते मान्य करण्यासाठी आमचं ओबीसी म्हणून विमुक्त म्हणून किंवा भटके म्हणून सांस्कृतिक परिवर्तन होणे गरजेचे आहे, आमच्या तांडा, पालावर जाऊन संविधान नुसतं वाचलं तर कळणार नाही, त्याचे तत्व सांगावे लागेल, ती तत्व तुमच्या संस्कृतीशी साधर्म्य आहेत ते सांगावं लागेल. 

उदाहरणासाठी सांगतो, बंजारा समाजाची संस्कृती काय आहे, पारधी समाजाची संस्कृती काय आहे. हि मनुवादी संस्कृती नाही आहे. हि आर्यांची संस्कृती नाही, ही ब्राह्मणी संस्कृती नाही, माझ्या बंजारा समाजामध्ये आणि विमुक्त मध्ये रामोशी म्हणा, पारधी म्हणा, त्यामध्ये दैववाद हा मूळ त्याच्या समाजामधला नाही आहे. बंजारा समाज कधीही दैववादी नाही, तो ईश्वरी पूजा करणारा नाही, तो लिंबाच्या झाडाखाली वर्षातून किंवा काही वर्षातून एकदाच पूजा करतो आणि ती पूजा हि देवाची, मूर्तीची नाही करत, तर तो जमिनीची पूजा करतो, मातीची पूजा करतो, वृक्षाची पूजा करतो, म्हणजे तो निसर्गाची पूजा करतो. हा समाज निसर्गपूजक आहे. निसर्गाने मला जीवन दिल आहे, म्हणून मी निसर्गाची राखण केले पाहिजे या विचाराचा आहे, आणि बुद्धांचे विचार यापेक्षा काय वेगळं होते. ज्या मातीने तुला जन्म दिला आहे, त्या मातीची राखण केली पाहिजे, ज्या पाण्यावर तू जीवन जगतो ते पाणी शुद्ध ठेवण्याच तुझं कर्तव्य आहे, हे जे विचार आहेत ते बंजारा समाजाच्या संस्कृतीशी जुळतात, म्हणून तर हा समाज निसर्गाच्या सानिध्यात राहिला, तो गावगाड्यात, वर्णव्यवस्थेत कधी घुसला नाही. हा समाज इथल्या कुठल्याच गोष्टीला धक्का न लागता, तुमच्या गावगाड्यात काय चालत त्याला धक्का न लागता ह्या सर्व गोष्टींपासून एकदम अलिप्त राहिलेला समाज आहे. या समाजाला जर आता मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेल, मूळ व्यवस्थेशी जर जोडायचं असेल तर येथील मूळ विचारसरणी कोणती आहे. दोन विचारसरणी आहेत, ब्राह्मणी आणि अब्राहमणी. आम्हाला कोणती विचारसरणी जवळची वाटते, कोणाशी मैत्री केली पाहिजे, आम्ही या अब्राह्मणी विचारसरणी म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारधारा.  फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हणजे काय, आंबेडकर म्हणजे काय, समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व हे विचार आम्ही शिकलो पाहिजे. पारधी आणि बंजारा मध्ये बंधुत्वाच नात जुळल पाहिजे, त्यांची मुलगी मी केले पाहिजे हे बंधुत्वाच नात आहे. या सांस्कृतिक परिवर्तनासाठी हनुमंत उपरे काका मला म्हणायचे, पोरा संविधान म्हणजे काय, संविधान फक्त वाचल म्हणजे संविधान समजलं असं नाही, जर हे संविधान समजलं तर मग तुमचे भटके अजून पर्यंत उपरे का राहिले? ते पूर्णपणे आंबेडकरवाद जगले, आंबेडकर वाद म्हणजे काय समता, बंधुता, न्याय, आणि बुध्द्धीजम शिवाय आंबेडकर वाद पूर्ण होत नाही मित्रांनो. 

सूत्रसंचालक: राठोड साहेब, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत आणि आपण खूप सुंदर माहिती दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये हेच म्हणतात की, संविधानामध्ये मी जे तत्त्व घेतले आहेत ती समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, हि फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेले नसून, ती मी माझे गुरू तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारातूनच घेतलेले आहेत. जी व्यक्ती बुध्द्धांच्या जीवनशैली ने वागतो तो व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाने वागतो, शाहू फुले आंबेडकरवादी, बौद्धवादी, कबीरवादी रविदासवादी आहे असे आपण समजावे. कार्यक्रमाच्या शेवटच्या संदेशवादी गोष्टींमध्ये आपल्याला एकच मिनिट बोलायच आहे, आपल्याकडे तीन मिनिट आहेत.  मा. झाकार्डे साहेब आजच्या कार्यक्रमाचा जो संदेश आहे की फुले शाहू आंबेडकरवादी विचारच भटक्या-विमुक्तांना संविधानिक हक्क आणि अधिकार देऊ शकतात यामध्ये आपण त्याला समअप करावे. 

मा. धनंजय झाकर्डे: सर्वप्रथम मी राठोड साहेबांना विनंती करेन, सर्वांना विनंती करेन, संस्कृती हा शब्द आम्ही टाळला पाहिजे. आमची कोणतीही संस्कृती नाही, आमची सभ्यता आहे आणि बंजारा समाजामध्ये संस्कृतीला धाटी म्हणतात, ऍक्च्युली ती आमची धाटी आहे आणि इथून पुढे आम्ही सभ्यता म्हणायला शिकलं पाहिजे. दुसरा महत्वाचा संदेश म्हणजे असा आहे, या भटक्या विमुक्त समाजातील युवकांना टार्गेट केलं पाहिजे, आणि त्यांना पकडून या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत, ही जबाबदारी जेवढी फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेतील लोकांची आहे तेवढीच जबाबदारी शिकल्या सवरलेल्या सर्व लोकांची आहे. ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी कळलेल्या आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही अब्राह्मणी शब्द सुद्धा टाळला पाहिजे,  येथून पुढे आम्ही गैरआंबेडकरवादी म्हटलं पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर वाद आमचा प्रधान आहे, इतरांना आम्ही गैर-आंबेडकरवादी म्हटलं पाहिजे किंवा गैर-मूलनिवासी म्हटलं पाहिजे. 1931 ला आमची जनगणना गैर हिंदू म्हणून झालेले होती म्हणून आम्ही मूलनिवासी आहोत, आता इतरांना आम्ही गैर मूलनिवासी म्हटलं पाहिजे आणि आम्ही आमची ओळख मूळनिवासी म्हणून प्रस्थापित केली पाहिजे, त्यासाठी झटले पाहिजे, आणि त्यासाठी प्रबोधन केलं पाहिजे एवढेच मला म्हणायचे आहे. धन्यवाद.

सूत्रसंचालक: सर आपण एकाच मिनिटांमध्ये जबरदस्त अहावान समाजाला केल आहे. मी मा. मदने सरांना विचारू इच्छितो की, आपलं भटक्या विमुक्त समाजाला काय आहवान राहील, जेणेकरून जे युवक वर्ग आहे किंवा जे शिक्षण घेणारा वर्ग आहे यांना एकत्र करून संघटन करून त्यांना मोठ्या संघटनेचे कसं जोडता येईल. कारण छोट्या छोट्या संघटनेमध्ये त्यांची प्रगती होणार नाही तर त्यांना मोठ्या संघटनशी कसं जोडता येईल. 

मा. उत्तम मदने: बरोबर आहे, या समुदायांची परिस्थिती सुधारवयाची असेल तर आपल्याला सर्वप्रथम भटक्या-विमुक्तांन मधील जो युवक वर्ग आहे ह्या युवक वर्गाला पकडण्याची गरज आहे, कारण जेव्हा युवक वर्गाला आपण छोट्या छोट्या संघटनेमध्ये बांधून त्यांना मोठ्या संघटनेचे जोडून घेऊ तेव्हा मोठ्या संघटनेकडून यांना एक perspective मिळू शकतो. गाव पातळीवर, तालुका पातळीवर, किंवा जिल्हा पातळीवर ज्या संघटना आहेत त्या संघटनांची बांधणी करण्यासाठी आपल्याला एक सिस्टिम उभी करावी लागेल. आणि हि सिस्टीम कोण उभी करू शकते तर आपण जे सर्व आंबेडकरवादी आहोत किंवा भटक्‍या विमुक्‍त जातीतील जो शिकलेला वर्ग आहे या सर्वांनी यासाठी पुढाकार घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे. हे काम करायला सुरुवात केल्यानंतर हे अशक्य आहे असं नाही, वेळ लागेल पण एक दिवस हे नक्कीच शक्य होईल, फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा भटक्यांच्या तांड्याव,  पालावर पोहोचलेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. 

सूत्रसंचालक: धन्यवाद मदने सर, आपण मोलाचा संदेश दिला, मी पुढे डॉ. विजय माने सर यांच्याकडे येऊ इच्छितो, आपल्याला जी जातीची ओळख दिलेली आहे ती जातीची ओळख आपल्या शत्रूने दिलेली आहे आणि हि जातीची दिलेली ओळख गौरवास्पद नाही, तर आपली जी मूळ ओळख आहे मूळनिवासी म्हणून ही मूळनिवासी म्हणून ओळख घेऊन समाजात वावरण्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता. 

डॉ. विजय माने: जात कोणाला सांगू वाटत नाही, मी जरी असलो तरी माझी जात मला सांगून वाटत नाही. कारण यातून न्यूनगंड येतो आणि याचा परिणाम पुढच्या व्यक्तीवर पडतच असतो, इथे मी एकच सांगेन, आपल्याला आपला इतिहास म्हणून आपल्याला सर्वच माहिती आहे, इथून पुढे आपल्या जातीतील आपल्याला जो नेता निवडायचा आहे तो आपल्या समाजासाठी किती साक्रीफाय करू शकतो हे पाहणे गरजेचे आहे, त्याच्या पुढे जाऊ आपल्याला संघटना बांधण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील यावर विचार करणे खूप गरजेचे आहे. 

सूत्रसंचालक: राठोड सरांना पण संदेशपर मेसेज मध्ये हेच विचारीन कि, आपल्या संघटनेचे नाव सत्यशोधक ओबीसी परिषद आहे, जो आपला भटका विमुक्त समाज आहे या समाजाला सत्यशोधकी विचार, समतासैनिक,  आणि कॅडर बिल्डिंग किंवा कार्यकर्ता निर्माण करण्याच्या प्रोसेस मध्ये आणण्यासाठी व्यापक संघटनेमध्ये कसं जोडता येईल. 

मा. उल्हास राठोड: सत्यशोधक चळवळ मध्ये मी खूप वर्षापासून कार्यरत आहे, त्यापूर्वी प्रा. मोतीराज राठोड यांनी स्थापन केलेल्या 'भारतीय आदिवासी भटके-विमुक्त युथ फ्रंट' या संघटने मध्ये मी कित्येक वर्ष मुंबई आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहे, भटक्या विमुक्तांच्या कामासाठी मी प्रा. मोतीराज राठोड आणि अन्य मंडळींबरोबर देशभर फिरलो आहे. भारतभर फिरून 191 जातींचा शोध घेतलेला आहे, त्यामुळे मला साधारण यांच्या सभ्येतेची ओळख आहे. सर्व भटक्यांची सभ्यता काय असली पाहिजे, त्यांचा कॉमन धागा काय आहे  तो आम्ही शोधला पाहिजे. भटक्या-विमुक्तांच्या शेकडो संघटना आहेत, मी आज एवढंच सांगेन की ज्या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे एखादं फेडरेशन करूयात, आणि त्यामध्ये समान मूल्य काय आहेत ते शोधून काढून आपलं मूल्य काय आहे तर फुले शाहू आंबेडकरी विचारधारा त्यामध्ये पेरली पाहिजे. 

सूत्रसंचालक: धन्यवाद सर, इथेच सर्वांचेच एकमत दिसत आहे, म्हणजे आमची कार्यपद्धती वेगळी आहे, किंवा आम्ही जे विषय हाताळत आहोत ते थोडे थोडे वेगळे आहेत, म्हणून काय आम्ही वेगळे नाहीत आमचा सर्वांचा उद्देश एकच आहे. या देशांमध्ये जी विषमतावादी व्यवस्था आहे त्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून एक क्रांती घडवून आणणे. देशांमध्ये समतावादी व्यवस्था आणणे, त्यासाठी आम्ही आमच्या वेगवेगळ्या संघटना मध्ये काम करत आहोत, त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे हा संदेश आपल्या सर्वच वक्त्यांनी येथे दिलेला आहे. आपले सर्व वक्ते या परीचर्चेमध्ये आले, त्यामुळे आम्ही MNT New Network चायनल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३)




“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २)

सूत्रसंचालक : हो सर, तुम्हाला तोच प्रश्न आहे की आज तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेऊन पुण्यामध्ये एक नामांकित डॉक्टर आहात आपल्याला हा जो समाज आहे तर या समाजामध्ये किती मुलं शालेय शिक्षण घेऊ शकतात आणि हे शिक्षण घेण्यासाठी भटक्या-विमुक्तांच्या मुलांना काय समस्या येतात हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल. 

डॉ. विजय माने: जसं मी म्हटलं की, कागदपत्रांशिवाय मुलांना ओळख नसते आणि त्यांना शाळेत पण जाता येणार नाही. शाळेत न गेल्यामुळे मुलं वंचित राहू शकतात आणि आपण जे म्हणतो उच्च-शिक्षण, उच्च शिक्षणासाठी आज काल पाहिल तर खूप कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण सगळ्याच मुलांना मेडिकल मिळेल किंवा इंजिनिअरिंग मिळेल हे शक्य नाही. मग आपण त्यातून काय करू शकतो. गव्हर्मेंट सगळ्यांना जॉब देऊ शकत नाही तर आपण इतर काय उपाययोजना करू शकतो याबद्दल विचार करावा असं मला वाटतं. 

सूत्रसंचालक: धन्यवाद सर, मी आता पुढील चौथे पॅनलिस्ट आहे, ते राठोड सर, हे ह्या विषयातील अभ्यासक आहेत, आपल्याला प्रश्न विचारताना मी माहिती सांगू इच्शछितो, कि महाराष्ट्रमध्ये जो धोबी/ परीट समाज आहे. व इतर प्रांतांमध्ये बिहार असेल, मध्यप्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल येथील धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये येतो. परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर हे ओबीसी मध्ये येतात. आणि त्याच्यामुळे भारतातील इतर भागातील धोबी समाज आणि महाराष्ट्रातील समाज एकत्रित येत नाही किंवा इथला धोबी समाज इतर राज्यातील समाजा बरोबर एकत्रीकरण करत नाही, अशीच परिस्थिती आपल्याला भटके-विमुक्त समाजामध्ये सुद्धा दिसते, तर हा एवढ्या मोठ्या प्रमाणात विघटित झालेला जो भटके विमुक्सत समाज आहे या समाजाला संघटित करण्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर आपण त्यांना संघटित करू शकतो यावर मार्गदर्शन करावे.  

मा. उल्हास राठोड: जय भीम, संघटित करण्याच एक सूत्र असायला पाहिजे, हे काम तुमच्या-आमच्यापैकी जे चळवळीचे लोक आहोत, विद्वान माणसे आहोत यांनी हे केलं पाहिजे. जसे आपण या पॅनलवर इतके लोक आहेत हे त्याचं काम आहे. भटक्या विमुक्तांची चळवळ गेले पन्नास वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे. 1871 पासून ही मंडळी सर्व गुन्हेगार म्हणून जेलमध्ये होते.  1952 मध्ये खरं स्वातंत्र्य या लोकांना मिळालेलं आहे, त्यामुळे संविधान कसं झालं, भारताला स्वातंत्र्य कसे मिळाल, याची काही माहिती या समाजाला नव्हती. यामध्ये विशेष करून पहिल्या ज्या 14 जाती आहेत त्यांना आपण विमुक्त म्हणतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस कायदेमंत्री होते. भारत स्वतंत्र होऊनही हा समाज अजून जेलमध्ये आहे आणि या समाजाला बाहेर काढायल पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिफारस केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर मध्ये येऊन तारेची कुंपण तोडली आणि समाजाला बाहेर काढलं. त्यांनी त्या त्या राज्याच्या सरकारला आदेश दिले होते की या लोकांना एससी-एसटी मध्ये घाला आणि त्यांचे संविधानिक अधिकार मजबूत करा.  परंतु असं झालं की इतक्या वर्षानंतरही भटका विमुक्त समाज अजून स्वातंत्र्याची पोळी खाऊ शकत नाही, तो स्वतंत्र जीवन जगू शकत नाही, या देशातला भटका विमुक्त समाज या देशाचे नागरिकत्व सुद्धा पत्करू शकत नाही. यामध्ये एकता राहिलेले नाही. त्यांच्याकडे नागरिकत्वाच काहीतरी कागदपत्र हव आहे, त्यावेळेस वसाहतीतून बाहेर पडले तेव्हा त्यांना कोणताही दाखला दिला गेला नाही, जर त्यावेळेस ते सर्टिफिकेट दिल असतं तर कमीतकमी हे भारताचे नागरिक आहेत हे तरी लोकांना कळलं असतं. भटक्या विमुक्त समाजाला जे प्रतिनिधी हवे होते ते प्रतिनिधी सुद्धा आतच असल्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाच कोणीच प्रतिनिधित्व करू शकलं नाही.  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर कोणतरी होते आणि त्यांनी संविधान लिहिले यांची ओळखही त्या लोकांना वसाहतींमध्ये नव्हती. पण भटक्या-विमुक्तांनी हे समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला इंग्रजांनी डांबून ठेवलेल्या या वसाहती मधून बाहेर काढण्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला होता. संविधानामध्ये आजही आम्हाला सर्व हक्क प्राप्त होऊ शकतात परंतु प्रश्न आहे की आंबेडकरी विचारधारा जोपर्यंत आम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत संविधानिक हक्कापर्यंत जाता येणार नाही. आतापर्यंत सर्व वक्त्यांनी सांगितलं आहे कि आमची अवस्था ना घर का ना घाट का अशी आहे, आमच्यामध्ये एक वाक्यता नाही. 

आमच्या भटक्यांची अवस्था काय आहे, आमचा भटका काय करतो, सकाळी चार वाजता डुकऱ्या वाजवतो, पाच वाजता मसनजोगी येतो, सहा वाजता कोणी येतो, सात वाजता आमचा बहुरूपी येतो अशा प्रकारे दिवसभर 24 तास भटक्यांचे एक वेळापत्रक बनलेल आहे. रात्री दोन वाजता आमचा पारधी येऊन हल्ला करून डाका मारून तो शेवटचा झोपतो.  सकाळ-दुपार-संध्याकाळ सगळ्यांना वाटण्या करुन दिलेल्या आहेत.  हे इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेली आमची परिस्थिती आहे. या व्यवस्थेतून जर बाहेर पडायचं असेल तर या पारंपारिक व्यवसायांना लाथाडलं पाहिजे. आता आम्ही संविधानिक राज्यामध्ये राहतो, आता आम्हाला कोठेही नोकरी करण्याचा हक्क आहे. आम्हाला वाटेल तसा आमचा व्यवसाय सुरू करण्याचा अधिकार आहे. आमच्या मध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक कुशल गट आहे आणि एक अकुशल गट आहे. आमच्या मध्ये जे लोक कुशल आहेत ते घिसाडी आहेत, काही अवजारे बनवणारे, काही लोक आमच्या नावावर करोडो रुपये कमवून त्यांची तिजोरी भरत आहेत. आमची कला आम्हाला जोपासण्यासाठी आम्ही कधी प्रयत्न करणार आहोत. त्याला राष्ट्रीय दर्जा कधी देणार आहोत. आमच्या कुशल वर्गाला आम्ही एम.आय.डी.सी. मध्ये कधी गाळा मिळवून देणार आहोत, यांचा व्यवसाय कधी सुरू करणार आहोत. आज भटक्यांच्या प्रगतीसाठी कार्यशाळा भरण्याची खूप नितांत गरज आहे. तो शिकला पाहिजे. मनुवादी व्यवस्थेने आम्हाला गावोगावी रामायण सांगायला पाठवलेल आहे. आमच्या गीतेचा प्रचार करा. आमच्या देवा धर्माचा प्रचार करा, ते घालतील त्या भिक्षेवर आम्ही जगायचं आहे. भटक्यांना यातून पूर्णता बाहेर काढणं आवश्यक आहे. त्यांचं पुनर्वसन करणे आवश्यक आहे. ज्यांचे पुनर्वसन झालेला आहे ते मात्र आज स्थिर आहेत. मी बंजारा समाजातील आहे, बंजारा समाज सगळ्यात जास्त वाढत आहे. लोक म्हणत आहेत की बंजारा समाजातील लोकांनी लीडरशिप करावी पण तसं न करता प्रत्येक समाजाने आपले आपले प्रतिनिधी पुढे केले पाहिजेत. 

भटक्या-विमुक्तांनी एक मोठा आंदोलन उभे केले पाहिजे, आम्ही शेतीचे तुकडे मागून घेतले पाहिजेत. बघा कोरोना सारखा महारोग आमच्या देशामध्ये पसरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे कारखाने, व्यवसाय बंद आहेत, ज्यांच्याकडे शेतीचे तुकडे आहेत ते नीट जगत आहेत. त्यांना ना कोरोनाची भीती आहे, ना त्यांना पोटापाण्याची भीती आहे. भटका समाज शिकला पाहिजे. वसंतराव नाईकांची मेहरबानी त्यांनी येथे आश्रम शाळा उघडल्या आहेत. शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. आमचं काम आहे आम्ही आमची मुलं तिथं पाठवली पाहिजेत. आमचं काम आहे आम्ही त्यांना शेतीचे तुकडे मागितले पाहिजेत. गायरान जमिनी आमच्या लोकांना दिल्यानंतर काढून घेतल्या खूप त्रास झाला.  

आज गरज आहे ती आम्ही सर्वांनी एकत्र येण्याची आणि शेतीचे तुकडे मागून घेण्याची.  जोपर्यंत आमचा समाज स्थिर होणार नाही तोपर्यंत आम्ही एन.टी.आर. मध्ये सुद्धा, एन.सी.आर. मध्ये सुद्धा, आणि सी. ए. ए. मध्ये सुद्धा आम्ही भारतीय नागरिक होणार नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वात मोठा नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातून प्रश्न कोणाचा असेल तर तो भटक्या विमुक्त समाजाचा आहे, कारण हा समाज गावोगाव भटकतो. त्यांची मुलं कुठे जन्माला आले, माझा जन्म मला माहित नाही कुठे झाला, तो तांड्यावर झाला की रस्त्यावर झालेला आहे. परंतु शाळेत गेल्यानंतर कुठेतरी एक नाव टाकून दिल आहे. पण खरं सांगतो माझं जन्मस्थळ अजूनही माझ्या दाखल्यावर लिहिलेलं नाही, माझ्या दाखल्यावर माझा धर्म लिहिलेला नाही. लोक म्हणत होते आम्ही बंजारे आहोत म्हणून आम्ही बंजारे आहोत. इथून पुढे आम्ही आमची संस्कृती निर्माण केली पाहिजे,  फुले शाहू आंबेडकरी विचारधारा स्वीकारण्यामागे कारण हे आहे, फुले शाहू आंबेडकरी चळवळ फार मोठी आहे, ती बाबासाहेबांचे विचार मांडणारी चळवळ आहे. सविधान मानणारी चळवळ आहे आणि संविधानातूनच प्रत्येक माणसाचं भलं होणार आहे................................................... 

सूत्रसंचालक: राठोड सर, आपण या चर्चेला पुढे कंटिन्यू करू, तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. याच माहितीला पुढे घेऊन जाण्यासाठी मी धनंजय झाकर्डे  सरांना प्रश्न करतो, पूर्ण भारतीय स्तरावर ओबीसी हा जो घटक आहे तो म्हणजे,  जो भारतातील व्यक्ती शेड्युल कास्ट नाहीये, शेडूल ट्राईब नाहीये आणि रिझर्व कॅटेगरी बाहेरील म्हणजे जसं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाहीये तर हा उर्वरित जो समाज आहे तो आदर बॅकवॉर्ड समाज आहे.  पूर्ण देशातला जो भटका विमुक्त समाज आहे याला जर कॉमन आयडेंटिटी अंतर्गत यायचं असेल आणि संविधानिक त्याची आयडेंटिटी आहे ते ओबीसी आहे. सामाजिक दृष्टिकोनातून आपण जे प्रचार-प्रसार करत आहोत आणि सामाजिक सभ्यता स्थापन करणार आहोत तर मग या समाजाचे आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय रोडमॅप सांगता येईल. 

मा. धनंजय झाकार्डे: धन्यवाद विशाल, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. येत्या काळामध्ये जेव्हा सभ्यतेच्या बाबतीत काही कार्यक्रम फिल्डमध्ये घेऊ तेव्हा काही गोष्टी लक्षात येतीलच. जसं राठोड साहेबांनी सांगितलं तसं संघटित करण्यासाठी काहीतरी सूत्र असावं लागतं. मी इतिहासात जाऊन मध्ययुगात काळात येतो, जास्त वेळ नाही घेणार. थोडक्यात प्रयत्न करतो. जे लोक यज्ञ संस्कृतीला विरोध करत होते त्या लोकांना राक्षस, असुर असं म्हटलं जात होतं. इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा हेच लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी भांडत होते तेव्हा त्यांना गुन्हेगार म्हटले गेलेल आहे. या लोकांना मात्र शिवाजी महाराजांनी गुप्तहेराच काम दिलेला आहे. जे लोक बहुरूपी, वासुदेव, रामोशी आहेत या लोकांचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या बरोबर घेतलं आहे, म्हणजे त्यांना त्यांनी त्यांच्या शासन-प्रशासनामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. जर या लोकांच्या क्षमतांना संधी दिली तर हे लोक काय करू शकतात हे आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहून शिकलं पाहिजे. या वर्गाला सर्व महापुरुषांशी जोडल पाहिजे, कारण या वर्गाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखल गेल आहे. मा. मदने साहेबांनी पण म्हटल आहे की तो वर्ग पशुपालक आहे, किंवा वेगवेगळ्या वर्गात विभागला गेलेला आहे. मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये जे काम या समाजाच्या वाट्याला आले, तेव्हा हि काम त्यांनी प्रामाणिकपणे केली. परंतु या कामामध्ये सुद्धा त्या त्या काळातल्या प्रशासनाकडून किंवा शासक जमातिकडून अडथळे निर्माण करण्यात आले, म्हणून इंग्रजांच्या काळात आपण पाहतो की सगळ्यात जास्त स्वातंत्र्यवीर कोण होते तर ते भटक्या विमुक्त समाजातील लोक होते. या लोकांनी इंग्रजांना सुखाने जगू दिलं नाही आणि याचाच वचपा काढण्यासाठी इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार जमाती ठरवलं. 

आज पर्यंत हे लोक या गुन्हेगारीची समस्या भोगत आहेत. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या लोकांची वेगवेगळी कॅरेक्टरीस्टिक्स आहेत आणि ह्यांचे कॅरेक्टरीस्टिक्स   घेतली आणि मापदंड लावले तर ते मापदंड शेड्युल कास्ट, शेड्युल ट्रायब यांच्याशी मिळती जुळती आहेत, काही लोक गावाच्या बाहेर राहत होते, कारागीर लोक आहेत, पशुपालक आहेत तर यांना ओ.बी.सी. मापदंड लागतात. जसं बंजाराला महाराष्ट्र मध्ये भटके-विमुक्त म्हणतात पण आंध्र प्रदेशामध्ये आदिवासी म्हणतात. या लोकांची अश छिन्नभिन्नता केलेली आहे, परंतु जेव्हा या लोकांचे पेहराव असतील, भाषा असतील किंवा अनेक काही गोष्ट असतील त्यांच्याकडे पाहिले तर त्यांच्यातील एकात्मता दिसून येते. मग ज्या या सर्व गोष्टी दिसून येतात त्या आपण पकडल्या पाहिजे त्या अलगत समोर मांडल्या पाहिजेत, आणि मग एकसूत्र पणे आपण त्यांना मूलनिवासी बहुजन या आयडेंटिटी खाली एकत्र करू शकतो. आपण वर्गवारी कमी केले पाहिजे आणि जातीव्यवस्थ कमी केले पाहिजे. अशा प्रकारे त्यांना एकत्र करून आपल्या हक्कासाठी लढा उभारला पाहिजे, यासाठी लढले पाहिजे, हे सांगितलं पाहिजे, आणि याच गोष्टी फुलेंनी शाहूंनी बाबासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या आहेत व त्यांच्या कृतीतून दाखवलेल्या आहेत. सर्व एकच आहोत हे जोपर्यंत आपण त्यांना पटवून सांगत नाही, त्यांच्यामध्ये पेरत नाही, तोपर्यंत आम्हाला त्यांना एका सूत्रात बांधता येणार नाही. या सर्वांनी हे समजलं पाहिजे की आम्ही या देशाचे मूलनिवासी आहोत आणि मूलनिवासी असल्यामुळेच वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो. स्वातंत्र्यासाठी  लढलो म्हणूनच आम्हाला कधी राक्षस, असुर, गुन्हेगार म्हटलं गेलं. क्रांतिसिंह नाना पाटलांनी जेव्हा प्रतिसरकार स्थापन केलं तेव्हा या प्रतिसरकार मध्ये लोकांनीही दरोडे टाकले आहेत, चोऱ्या केल्या आहेत मग ते जर स्वातंत्र्यसैनिक होऊ शकतात तर मग या लोकांनी त्यांना हक्क मिळवण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, हे सर्व केले तर हे स्वातंत्र्यसैनिक का होऊ शकत नाहीत. 

सूत्रसंचालक:  मा. झाकार्डे सर, तुम्ही येथे वर्गीकरण कमी करून एकत्रीकरण करणे गरजेचे आहे हा एक महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. देशामध्ये वर्गीकरण जास्तीत जास्त करा असा संदेश आपला शत्रू पक्ष समाजामध्ये पसरवत आहे परंतु आपल्याला समाजामध्ये एकत्र करण्याची मानसिकता निर्माण करायची आहे. मा. मदने सरांना मी प्रश्न विचारू इच्छितो की, जसं गांधीजींची एक विचारधारा आहे, त्यांची विचारधारा अशी आहे की, ज्या जातीत जो माणूस जन्माला आला आहे, आणि तो दहावी झालेला आहे किंवा त्याने चांगलं शिक्षण घेतलेला आहे. आता त्या व्यक्तीने काय करायचं तर तो ज्या समाजात जन्माला आलेला आहे त्या समाजाचे जे काम आहे तेच काम तू कर, अशा प्रकारची एक विचारधारा आहे त्याला गांधीवादी विचारधारा असे म्हणतात. आणि दुसरी एक गोळवळकरवादी विचारधारा आहे, जी अशी आहे की ज्या जातीत जन्माला आला आणि ज्या जातीचे जे कार्य आहे तेच कार्य त्या समाजाने करत राहावे, म्हणजेच स्टेटस्को वाली एक विचारधारा आहे. जशा परिस्थिती मध्ये तुम्ही आहात त्याच परिस्थितीमध्ये राहा, या अपरिवर्तनीय विचारधारा आहेत याउलट या देशांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरवादी अशी एक विचारधारा आहे की जी क्रांतिकारी विचारधारा आहे. फुले यांची विचारधारा असे सांगते की आमचा जो समाज आहे, जो पर्यंत सत्याचा शोध घेणार नाही, त्याच्या समस्या कशा निर्माण झाल्या, त्या समस्येची कारण काय आहेत, या समस्या कशा सोडवाव्यात हे जोपर्यंत तो शोधणार नाही, तसेच बाबासाहेबांची समतेची विचारधारा जो पर्यंत तो समजणार नाही तोपर्यंत तो आपले संविधानिक अधिकार काय आहेत हे समजू शकणार नाही. तर मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की गांधी, गोळकरवादी विचारधारेने भटक्या-विमुक्तांची प्रगती होऊ शकते का? कि फुले-शाहू-आंबेडकरवादी विचाराने भटक्यांचे प्रगती होऊ शकते आणि संविधानिक अधिकार प्राप्त होऊ शकतात या अनुषंगाने आपण आपल्या दर्शकांना माहिती द्यावी. 

मा. उत्तम मदने:  खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्तांची परिस्थिती सुधरावयाची असेल तर भटक्या-विमुक्तांना फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारे शिवाय  दुसरा पर्यायच नाही.  आंबेडकरी विचारधारा घेऊनच भटके-विमुक्त त्यांची परिस्थिती सुधारू शकतात, कारण जर आपण गांधी विचारधारा पाहायला गेलो किंवा गोळवळकर विचारधारा पाहायला गेलो, तर या विचारधारेमध्ये व्यक्तीची आयडेंटिटी पहा किंवा डिग्निटी पहा, मग ती व्यवसायाच्या अनुषंगाने असेल किंवा जातीच्या अनुषंगाने असेल या सर्वांमध्ये एक व्यक्ती म्हणून किंवा ह्युमन बीइंग म्हणून सर्व मानवी मूल्यांच हनन होत आहे. आणि त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने आपल्याला फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारा घेऊन जाते, ती आपल्याला आपल्या हक्काचे भाषा शिकवते, आपल्या कर्तव्याची भाषा शिकवते, आपल्याला समतावादी, समानतावादी ची भाषा शिकवते. तर या सर्व गोष्टी भटक्या-विमुक्त समाजाने आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. कारण की भटके-विमुक्त म्हणून काही भटके काही राज्यांमध्ये शेड्युल कास्ट मध्ये असतील शेडूल ट्राईब मध्ये असतील आणि महाराष्ट्रात तर यांची सेपरेट कॅटेगरीज आहे. आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड मिळालेले आहेत तर या मिळालेल्या सेफगार्ड चा जास्तीत जास्त फायदा घेऊन जास्तीत जास्त समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे आणि जेव्हा हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात येईल आणि शिकल्यानंतर आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत, आपल्यावर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहेत, हे विदारक चित्र जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा हा समाज पेटून उठणार आहे. या समाजातुन लोक शिकलेले नाहीत असं झालेलं नाही, या समाजातून काही थोड्याफार प्रमाणात लोक शिकलेले आहेत. बाबासाहेबांनी एक संकल्पना राबवली होती ती म्हणजे PAY BACK to SOCIETY.  डॉ. बाबासाहेबांच्या या पे बॅक टू सोसायटी या संकल्पनेला अनुसरून या समाजातून जे जे लोक शिकलेले आहेत त्यांनी आपल्या पाठीमागील समाज जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात कसा येईल, त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, गाव पातळीवर, तालुका पातळीवर, व जिल्हा पातळीवर आपल्याला कोणत्या Strategy बांधाव्या लागतील, तसेच फुले-आंबेडकरी विचारधारा भटक्यांच्या पाला वरती, तांड्यावर पोचवण्यासाठी आपल्याला कोणत्या Strategy आखाव्या लागतील याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. खूपसाऱ्या संघटना आहेत, त्या काम करत आहेत परंतु खूप सार्‍या संघटना ह्या जातीपुरत्या मर्यादित आहेत. आणि त्या त्यांच्या जातीसाठी काम करत आहेत. आपल्याला कल्लेक्टीव काम करायचं म्हटलं, समायोजनाच्या भूमिकेतून काम करायचं म्हटलं तर आपल्याला या वेगवेगळ्या संघटनांचं एकत्रीकरण करणे गरजेचे आहे. हे एकत्रीकरण करून आपल्याला या संघटनांना हेही सांगणे महत्वाच आहे की फुले-शाहू-आंबेडकरी विचार भटक्यांची परिस्थिती बदलण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. गावोगावी जे युवक वर्ग आहे, त्यांना एकत्रित आणणे, त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग देणे, मग या ट्रेनिंग मध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात पण मी म्हणेल की भटक्या-विमुक्तांना जर कोणत ट्रेनिंग द्यायचं असेल तर ते पहिल्यांदा संविधानिक ट्रेनिंग त्यांना एकदा कळू द्यात, आपले हक्क काय आहेत, ते आपण कसे मिळवू शकतो, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हक्क मिळवल्यानंतर आणि आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही या सर्व गोष्टी भटक्यांच्या पाला पर्यंत, तांडा पर्यंत पोहोचन खूप गरजेच आहे. त्यासाठी युथ कॅडर बिल्डिंग होणं खूप गरजेचं आहे. युवकांना त्या पद्धतीने मार्गदर्शन होणे आणि मिळणे गरजेचे आहे. एकंदरीतच सर्व संस्था-संघटनांनी कलेकटीव विचार करणं खूप गरजेचं आहे. (भाग-३ वाचा)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - १)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - २)


“फुले-आंबेडकरी विचारच भटक्या-विमुक्तांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार बहाल करू शकतात” (भाग - ३)




Monday, 27 April 2020

WARDITLA MANUS

"WARDITLA MANUS"
Uttam Madane
This is the comment that I have given on documentary made by my friend Riyaj and his Team to give salutes to ‘Warditla Manus’ and their family.

Documentary: 

 Comment:

Dear Riyaj & All Team
Heartily congratulation for such meaningful documentary, it is real salute to the heroes who are working in front line (Police) as well as back of the stage (their family).

रियाज, हि जी २ मी. १६. सेकंदाची documentary बनवली आहे, ती खूप काही सांगून जात आहे. या मध्ये तुम्ही सर्व टीम ने दोन गोष्टी अतिशय समर्पकपणे पुढे आणल्या आहेत. एक म्हणजे स्त्रीचे जीवन आणि कर्तृत्व. या समाज व्यवस्थेत स्त्रीचा दर्जा काय आहे, त्याच बरोबर समाज व्यवस्थेने gender नुसार केलेली कामाजी विभागणी हे अत्येंत समर्पक पद्धतीने टिपले आहे. (Please see the concept of Sex and Gender, how both plays different role and how both are different). हे या पोलीस कॉन्स्टेबल च्या बोलण्यातून समोर येते जसे कि, माझा डब्बा झाला का? एवढा वेळ काय करत होतीस? धुनी-भांडी करत बसली असशील, कपड्यांना इस्त्री केली का? आणि वरून या बायकांचं कसं होणार वगैरे वगैरे. या सर्व डायलॉग मधून स्त्रीने एवढी सर्व कामे करूनही पुरुष मंडळीं (Masculinity power) त्यांच्या बद्दल काय दृष्टीकोन बाळगतात हे खूपच छान पद्धतीने मांडले आहे कि जे समाजातील वास्तव परीस्थितीचे दर्शन देते. 

समाज व्यवस्थेत स्त्रियांच्या कामाचे मोल कुठेच केले जात नाही, स्त्री सकाळी उठल्या पासून संध्याकाळी झोपेपर्यंत घरातील किती कामे करते, उदा. सकाळी उठले कि घर झाडणे, अंगण झाडणे, घरातील लोकांसाठी चहा बनवणे, नाष्टा बनवणे (काही वेळेस प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी नुसार वेग-वेगळा नाष्टा – जेवण बनवणे), घरात लहान मुल असतील तर त्यांचे आवरणे, मुलांचा शाळेचा व नवऱ्याचा ऑफिसचा डब्बा तयार करणे, मुलांना वेळेवर शाळेत सोडणे, घरी कोणी म्हतारे सासू-सासरे असतील तर त्यांचे सर्व पाहणे, दुपारचे जेवण तयार करणे, भांडी धुणे, अशी रात्री झोपे पर्यंत ती कामे करत असते, (मी पूर्ण लिस्ट लिहित नाही, हि न संपणारी लिस्ट आहे). हे सर्व दिवसभर ती करत असते, दुसऱ्या दिवशी उठले कि तेच शेड्यूल पुन्हा चालू होऊन जात, आणि या कामाला कोणतच मूल्य (पैश्यांच्या व appreciation च्या स्वरूपातील) मिळत नाही, एवढे करून हि तिला ऐकावे लागते कि, तू काय काम करते? दिवसभर तर घरीच असते. ती जे हे सर्व काम करत आहे त्याच मूल्य काढल तर ते किती होईल याचा कुटुंबातील कोणीही विचार करत नाही. तिचा तो किती मोठा income असेल परंतु समाज व्यवस्थे मध्ये त्याला zero व्ह्यालू आहे.

documentary मध्ये पोलीस कॉन्स्टेबल च्या बायकोला चहा पिण्यास हि वेळ नाही, कारण हा लॉक डाऊन किती महत्वाचा आहे व माझ्या नवऱ्याला तिथे जाने किती गरजेचे आहे या विचारांमध्ये ती पूर्ण हरवून डब्बा तयार करण्याच्या पाठीमागे लागली आहे. हे सर्व करत असतानी बाहेर खाण्यासाठी कुठेच काही मिळणार नाही व तुमच्या बरोबरीला तुमचे जे सहकारी असतील त्यातील काही सहकाऱ्यांनी कदाचित काही कारणास्तव डब्बे आणले नसतील तर अशा कठीण प्रसंगी ते उपाशी राहू नयेत म्हणून जो जास्तीचा डब्बा देऊन समाज भान व जबाबदारी दाखवली आहे यातूनच स्त्रियांच्या प्रगल्भ विचारांचे व कर्तृत्वाचे दर्शन होत आहे. हि झाली पहिली गोष्ट.

दुसरी गोष्ट म्हणजे. पोलीस कॉन्स्टेबल कि जो अशा लॉक डाऊन च्या कठीण प्रसंगी आपल्या ड्युटी वर वेळेवर पोहचण्यासाठी करत असलेल्या घाई मध्येचं त्याच्या ड्युटीची जबादारी प्रकर्षाने दिसून येते. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी तो नेहमीच हसत मुखाने तयार असतो हा massage खूप भाऊन जात आहे. तो अशा कामाला लागला आहे कि संध्याकाळी घरी येईल का नाही याच उत्तर कोणच देऊ शकत नाही. शेवटी आपल्या बायकोच्या अशा प्रगल्भ विचार व वागण्याला भारावून जाऊन पोलीस कॉन्स्टेबल जे पुट-पुटतो कि ‘या बायकांचं काहीच कळत नाही’ यातून समाजातील ज्या पुरुषांनी बायकांची ताकत, विचार, व कर्तृत्व स्वीकारून आपण दोघंही बरोबरीचेच आहोत हे मान्य केले आहे  हा massage उत्कृष्ट पद्धतीने मांडला आहे.

शेवटी एवढेच म्हणावेशे वाटते कि लॉक डाऊनच्या अशा कठीण प्रसंगी देशभरातील जेवढे खाकी वर्दीतील कामाला लागले आहेत त्याचं शब्दात कौतुक करणे कठीण आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहून पूर्ण घराची जबाबदारी उचलून त्यांना साथ देणाऱ्या सर्व स्त्रीयांना salute.   

Monday, 13 April 2020

लॉकडाऊन मध्ये घरगुती/कौटुंबिक हिंसाचारात वाढ


उत्तम मदने

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पूर्ण देशभर लागू केला. या जनता कर्फ्युला पूर्ण देशभर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालन्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व लोकांना घरून काम करण्याचे व घरातून बाहेर न येण्याचे आव्हान करण्यात आले. काल दि. ११ एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मिटिंग मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व गांभीर्य लक्षात घेऊन हा लॉकडाऊन दि. ३० एप्रिल पर्यंत तसाच सुरु ठेवण्याचे आदेश दिले.

या लॉकडाऊनच्या कालावधी मध्ये वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून लॉकडाऊन मुळे जगाला आणि भारताला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल यावरती आपण सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा ऐकत आणि पाहत आहोत, तसेच लॉकडाऊन मुळे काही सकारात्मक गोष्ठी पण घडत आहेत जसे के सर्व प्रकारचे उद्योग धंदे, रस्त्यावर धावणारी वाहने इ. सर्व बंद असल्यामुळे वायू, जल, आणि ध्वनी प्रदुशनाबाबत पूर्ण जगभर पोझीटीव्ह चर्चा केली जात आहे. अशा या सर्व पोझीटीव्ह आणि निगेटिव्ह चर्चेमध्ये एक धक्का दायक विषय समोर येत आहे तो म्हणजे जगभरात घरगुती हिसाचार आणि बाल अत्याचाराच्या प्रमाणात झालेली वाढ.

द गार्डियन वीक्ली या साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, चीन मधील हुबेई प्रोविन्स मध्ये फेब्रुवारी महिन्यात घरगुती हिंसाचाराच्या  १६२ तक्रारींची नोंद झाली आहे कि जी गेल्या वर्षी फक्त ४७ होती. वान फी या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार घरगुती हिंसाचाराची ९०% कारणे हि कोविड – १९ च्या संबंधित आहेत. द गार्डियन वीक्ली या साप्ताहिकातील माहिती नुसार स्पेन देशात लॉक डाऊन ची अंमल बजावणी खूप काटेकोर पणे केली जात आहे आणि जो कोणी नियम मोडेल त्याला दंड आकारला जात आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये तिथे महिलाने जर अत्याचाराची तक्रार नोंदवण्यासाठी घर सोडले तर तिला दंड आकारला जाणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तेथील activist ने १९ मार्च रोजी घडलेली हिसाचाराची घटना सांगितली त्यानुसार वालेन्शियाच्या किनारी प्रांतात पतीने मुलांसमोर आपल्या पत्नीचा मर्डर केला. अशा प्रगत म्हणवणाऱ्या देशातहि महिलांना पुरुष प्रधानातेतून येण्याऱ्या अहंकार व हिंसाचाराला सामना करावा लागत आहे.

प्रसार माध्यमातून घरगुती अत्याचाराबद्दल प्रकाशित झालेली आकडेवारी पाहता असे लक्षात येते कि सर्वच देशांमध्ये घरगुती हिंसाचारामध्ये वाढ झाली आहे. यात स्पेन मध्ये लॉक डाऊन घोषित केल्याच्या नंतर अवघ्या पहिल्या दोनच आठवड्यात महिलांकडून मदत केंद्रावर मदतीसाठी नेहमीपेक्षा १८% जास्त दूरध्वनी कॉल आले. तर फ्रेंच पोलिसांनी टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराविरोधातील मदतीसाठी ३०% कॉल वाढल्याचे सांगितले आहे. इंग्लंड मध्ये मदतीसाठी २५% कॉल वाढले. ऑस्ट्रेलियामध्ये लॉक डाऊन च्या काळात घरगुती हिंसाचारापासून कशी सुटका करून घ्यावी हा गुगल वर सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे, हे गांभीर्य लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कौटुंबिक समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समुपदेशकांना या गंभीर समस्येवर काम करण्यासाठी १५ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सची तरतूद करून दिली आहे.

प्रगत देशातील हि हिंसाचाराची स्थिती पाहता या समस्येची जटिलता लक्षात येते.  भारतातहि या समस्येची पाळेमुळे खूप खोल रुजलेली आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानुसार २४ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० या ९ दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे ६९ तक्रारींची नोंद झाली आहे आणि हे प्रमाण एरवीपेक्षा जास्त आहे, परंतु भारतात परिस्थिती अशी आहे कि, अन्याय अत्याचार झाला तरी महिला समोर येत नाहीत व बोलत नाहीत, महिलांमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती नाही. लॉक डाऊन च्या काळात घरगुती हिंसाचाराची पोलीस स्टेशन ला तक्रार केली तर इतरत्र कुठे आसरा मिळण्याची शक्यता नाही, अशा परिस्थितीमध्ये पोलीस दखल घेतील कि नाही, तक्रार केलेली पतीला व सासरच्या लोकांना समजले तर छळात अजून वाढ होऊ शकते अशी भिती वाटणे, अश्या अनेक कारणांमुळे भारतात महिला हिंसाचार झाला तरी पुढे येऊन तक्रार नोंदवण्यास घाबरत आहेत असे असू शकते.

राष्ट्रीय महिला आगोयाने एका अभ्यासानुसार नमूद केल्याप्रमाणे देशात ७१% पुरुषांकडे मोबाईल फोन असतील तर स्त्रियांच्या बाबतीत ते प्रमाण ३८% एवढेच आहे, त्यात आणखीन साक्षरतेचे प्रमाण कमी, शिक्षित असल्या तरी technical बाबीत बऱ्याच महिला अजूनही मागासलेल्या अवस्थेत आहेत, इ-मेल वापरता न येणे, किंवा इतर माध्यमांचा वापर करता न येणे, अश्या खूप साऱ्या कारणांमुळे अजून हि बऱ्याच तक्रारी पत्राद्वारे आयोगाकडे येतात.
भारतातील महिलांची सामाजिक स्थिती पाहता महिला घरगुती हिंसाचाराबाबत अजून जागृतच नाहीत हे लक्षात येते. घरगुती हिंसाचार नेमक कशाला म्हणावे? घरगुती हिंसाचार होत असेल तर आपल्या सरंक्षणासाठी आपण काय करू शकतो? कोणाकडे तक्रार करू शकतो? या संदर्भात कायद्यांची काही तरतूद आहे का? अश्या खूप साऱ्या गोष्टींची खूप साऱ्या महिलांना माहितीच नाही आहे.

घरगुती हिंसाचार म्हणजे काय?
स्त्री ज्या परिवारासोबत वा साथीदारासोबत एकाच छताखाली राहत असेल आणि तिचा छळ मग तो शारीरिक छळ म्हणजे मारहाण, चावणे, ढकलणे, दुखापत करणे, वेदना देणे, लैंगिक छळ म्हणजे स्त्रीच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध समागम करणे, अश्लील फोटो काढणे, बिभत्स कृत्य करणे, अश्लील चाळे करणे, बदनामी करणे, तोंडी आणि भावनिक अत्याचार जसे अपमान करणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही – होत नाही म्हणून टोमणे मारणे, घालून-पाडून बोलणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमानीत करणे, कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे, आर्थिक अत्याचारात हुंडय़ाची मागणी करणे, मुलांच्या पालन-पोषणासाठी पैसे न देणे, महिलेला औषध उपचार न करणे, नोकरी करण्यास मज्जाव करणे, असेल तर सोडण्यास सांगणे, प्रसंगी घरातून हाकलून देणे इ. प्रकारे स्त्रीला छळवाद सहन करावा लागतो.

शारीरिक छळ
शारीरिक छळात घरातील व्यक्तीकडून महिलेला मारहाण त्यात मंग तोंडात मारणे, लाथा मारणे, हात-पाय पिरगाळणे, केस ओढणे, चावणे, गुद्दे मारणे, ढकलणे, गरम वस्तूचे चटके देणे, किंवा इतर प्रकारे शाररीक दुखापत करणे, गळा दाबाने, मारण्यासाठी सुरा, चाकू, काठी, दाभण, भांडी, लोखंडाच्या इतर वस्तूंचा वापर करणे, अंगावर थुंकणे, रागात चिमटे काढणे इ. समावेश केला जातो.

लैंगिक अत्याचार
लैगिक अत्याचारांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो, यामध्ये महिलेच्या इच्छे विरुद्ध शारीरिक बळाचा वापर करून लैगिक संबंध करण्यासाठी तिच्यावर दबाव आणने हि प्रमुख गोष्ट असून यात विवाहांतर्गत बलात्कार, छेडछाड, इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श, सहेतुक लैंगिक भाषेचा वापर, आई-बहीणीवरून शिव्या, लैंगिक अवयवांना इजा, इच्छेविरुद्ध मोबाईलवरून अश्लील बोलणे व अश्लील चित्र, व्हिडीओ पाठविणे/दाखवणे, इच्छेविरुद्ध पॉर्न फिल्म दाखविणे, इच्छेविरुद्ध/त्यांना माहीत नसताना त्यांच्याच लैंगिक अवयवांचे फोटो काढणे व इतर अनेक प्रकारे नियंत्रण/बंधन घालणे इ. समावेश होतो.

तोंडी आणि भावनिक अत्याचार
तोंडी आणि भावनिक अत्याचार जसे अपमान करणे, वाईट नावाने बोलावणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही म्हणून अपमान करणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे. महिलेला किंवा तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यास मज्जाव करणे, नोकरी स्वीकारण्यास व करण्यास मज्जाव करणे, स्त्रीला व तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला घरामधून बाहेर जाण्यास मज्जाव करणे, नेहमीच्या कामासाठी कोणत्याही व्यक्तीबरोबर भेटण्यास मज्जाव करणे, महिलेला विवाह करावयाचा नसल्यास विवाह करण्यास जबरदस्ती करणे, महिलेच्या पसंतीच्या व्यक्ती बरोबर विवाह करण्यास मज्जाव करणे, त्याच्या अथवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास जबरदस्ती करणे, आत्महत्येची धमकी देणे इतर कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे यांचा समोवश होतो.

आर्थिक अत्याचार
आर्थिक अत्याचारात हुंडयाची मागणी करणे, महिलेच्या किंवा तिच्या मुलांचे पालन –पोषणासाठी पैसे न देणे, महिलेला किंवा तिच्या मुलांना अन्न, वस्त्र, औषधे इत्यादी न पुरविणे, नोकरीला मज्जाव करणे, नोकरीवर जाण्यासाठी अडथळा उत्पन्न करणे, नोकरी स्वीकारण्यास संमती न देणे, पगारातून रोजगारातून आलेले पैसे काढून घेणे, महिलेला तिचा पगार, रोजगार वापरण्यास परवानगी न देणे, राहात असलेल्या घरातून हाकलून देणे, घराचा कोणताही भाग वापरण्यास किंवा घरात जाण्यास, येण्यास अडथळा निर्माण करणे, घरातील नेहमीचे कपडे, वस्तू वापरण्यापासून रोखणे, भाड्याच्या घराचे भाडे न देणे या बाबींचा समावेश होतो.
अशा सर्व प्रकारच्या घटना जर महिलांबरोबर घडत असतील तर त्या सर्व घरगुती/कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात, याची महिलांना प्रकर्षाने जाणीव करून देणे गरजेचे आहे.

समाजामध्ये महिलेने चूल-मुल सांभाळणे व मुलांना जन्म देणे यापलीकडे तिचे अस्तित्वच नाही अशी धारणा अजूनही आहे. या धारणेला गरीब, श्रीमंत, जात, धर्म, पंथ, शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, नोकरीवाली, बिगर नोकरीवाली असा कुठलाही अपवाद नाही, स्त्री-पुरुष समानता कायद्याने मान्य केलेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम १४ नुसार भेदभावापासून मुक्ती, कलम १५ अन्वये स्त्री-पुरुष समानता, कलम २१ प्रमाणे जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क कायद्याने महिलानाही दिला आहे. एवढे बरेच काही नियम असताना सुद्धा महिला कौटुंबिक हिंसाचारास बळी पडतात. अशा या कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने २००५ साली “कौटुंबिक हिंसाचार कायदा – २००५” अस्तित्वात आणला. या कायद्याची अंमलबजावणी २६ ऑक्टोंबर २००६ पासून सुरु करण्यात आली. त्याचबरोबर कौटुंबिक न्यायालय कायदा १९८४ नुसार भारत सरकारने ठीक-ठिकाणी कौटुंबिक न्यायालये स्थापन केली आहेत तसेच विवाह समुपदेशक यांची मदत न्यायाधीशांना उपलब्ध केली आहे व न्यायालयात होणारे समुपदेशन सक्तीचे करण्यात आले आहे. वर नमूद केलेले हिंसाचार जर महिलांबरोबर होत असतील तर महिलेने काय करावे.....
  • महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर महिलांनी १०३ या क्रमांकावर फोन केल्यास पोलिसांकडून तातडीने मदत मिळू शकते

  • स्त्रियांसाठी अनेक समाजसेवी संस्था, NGOs काम करत आहे, तसेच राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग महिलांच्या विविध प्रश्नावर काम करतात.

अशा या कौटुंबिक हिंसाचाराला केवळ महिलाच बळी पडतात असे नाही तर कित्येक पुरुष हि बळी पडत आहेत, बरेच पुरुष व त्यांचे कुटुंबीय ‘कौटुंबिक हिंसाचार’ कायद्यांतर्गत खोट्या आरोपांमध्ये अडकलेले आहेत.  परंतु कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महिलांच्या प्रमाणापेक्षा पुरुषांचे प्रमाण खूपच कमी आहे. अजून तरी पुरुषांसाठी कोणताच कायदा नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये पुरुष ‘पुरुष हक्क संरक्षण समिती’ किंवा ‘सेव्ह इंडिया फमिली फाउंडेशन’ सारख्या संस्थांची मदत घेऊ शकतात.

 स्त्री-पुरुष समानता कायद्याने मान्य केलेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम १४ नुसार भेदभावापासून मुक्ती, कलम १५ अन्वये स्त्री-पुरुष समानता, कलम २१ प्रमाणे जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क कायद्याने महिलानाही दिला आहे. समानतेच जीवन जगन, प्रतीष्टेने जगणे, हिंसामुक्त जगणे, निरोगी जीवन जगणे हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे आणि स्त्रियांचे असे सर्व अधिकार अबाधित राहणे हि सर्व समाजाची जबाबदारी आहे.

Note: This Article has published in 'Baramati Zatka News Channel' on 12.04.2020.