About me

Monday, 27 April 2020

WARDITLA MANUS

"WARDITLA MANUS"
Uttam Madane
This is the comment that I have given on documentary made by my friend Riyaj and his Team to give salutes to ‘Warditla Manus’ and their family.

Documentary: 

 Comment:

Dear Riyaj & All Team
Heartily congratulation for such meaningful documentary, it is real salute to the heroes who are working in front line (Police) as well as back of the stage (their family).

रियाज, हि जी २ मी. १६. सेकंदाची documentary बनवली आहे, ती खूप काही सांगून जात आहे. या मध्ये तुम्ही सर्व टीम ने दोन गोष्टी अतिशय समर्पकपणे पुढे आणल्या आहेत. एक म्हणजे स्त्रीचे जीवन आणि कर्तृत्व. या समाज व्यवस्थेत स्त्रीचा दर्जा काय आहे, त्याच बरोबर समाज व्यवस्थेने gender नुसार केलेली कामाजी विभागणी हे अत्येंत समर्पक पद्धतीने टिपले आहे. (Please see the concept of Sex and Gender, how both plays different role and how both are different). हे या पोलीस कॉन्स्टेबल च्या बोलण्यातून समोर येते जसे कि, माझा डब्बा झाला का? एवढा वेळ काय करत होतीस? धुनी-भांडी करत बसली असशील, कपड्यांना इस्त्री केली का? आणि वरून या बायकांचं कसं होणार वगैरे वगैरे. या सर्व डायलॉग मधून स्त्रीने एवढी सर्व कामे करूनही पुरुष मंडळीं (Masculinity power) त्यांच्या बद्दल काय दृष्टीकोन बाळगतात हे खूपच छान पद्धतीने मांडले आहे कि जे समाजातील वास्तव परीस्थितीचे दर्शन देते. 

समाज व्यवस्थेत स्त्रियांच्या कामाचे मोल कुठेच केले जात नाही, स्त्री सकाळी उठल्या पासून संध्याकाळी झोपेपर्यंत घरातील किती कामे करते, उदा. सकाळी उठले कि घर झाडणे, अंगण झाडणे, घरातील लोकांसाठी चहा बनवणे, नाष्टा बनवणे (काही वेळेस प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी नुसार वेग-वेगळा नाष्टा – जेवण बनवणे), घरात लहान मुल असतील तर त्यांचे आवरणे, मुलांचा शाळेचा व नवऱ्याचा ऑफिसचा डब्बा तयार करणे, मुलांना वेळेवर शाळेत सोडणे, घरी कोणी म्हतारे सासू-सासरे असतील तर त्यांचे सर्व पाहणे, दुपारचे जेवण तयार करणे, भांडी धुणे, अशी रात्री झोपे पर्यंत ती कामे करत असते, (मी पूर्ण लिस्ट लिहित नाही, हि न संपणारी लिस्ट आहे). हे सर्व दिवसभर ती करत असते, दुसऱ्या दिवशी उठले कि तेच शेड्यूल पुन्हा चालू होऊन जात, आणि या कामाला कोणतच मूल्य (पैश्यांच्या व appreciation च्या स्वरूपातील) मिळत नाही, एवढे करून हि तिला ऐकावे लागते कि, तू काय काम करते? दिवसभर तर घरीच असते. ती जे हे सर्व काम करत आहे त्याच मूल्य काढल तर ते किती होईल याचा कुटुंबातील कोणीही विचार करत नाही. तिचा तो किती मोठा income असेल परंतु समाज व्यवस्थे मध्ये त्याला zero व्ह्यालू आहे.

documentary मध्ये पोलीस कॉन्स्टेबल च्या बायकोला चहा पिण्यास हि वेळ नाही, कारण हा लॉक डाऊन किती महत्वाचा आहे व माझ्या नवऱ्याला तिथे जाने किती गरजेचे आहे या विचारांमध्ये ती पूर्ण हरवून डब्बा तयार करण्याच्या पाठीमागे लागली आहे. हे सर्व करत असतानी बाहेर खाण्यासाठी कुठेच काही मिळणार नाही व तुमच्या बरोबरीला तुमचे जे सहकारी असतील त्यातील काही सहकाऱ्यांनी कदाचित काही कारणास्तव डब्बे आणले नसतील तर अशा कठीण प्रसंगी ते उपाशी राहू नयेत म्हणून जो जास्तीचा डब्बा देऊन समाज भान व जबाबदारी दाखवली आहे यातूनच स्त्रियांच्या प्रगल्भ विचारांचे व कर्तृत्वाचे दर्शन होत आहे. हि झाली पहिली गोष्ट.

दुसरी गोष्ट म्हणजे. पोलीस कॉन्स्टेबल कि जो अशा लॉक डाऊन च्या कठीण प्रसंगी आपल्या ड्युटी वर वेळेवर पोहचण्यासाठी करत असलेल्या घाई मध्येचं त्याच्या ड्युटीची जबादारी प्रकर्षाने दिसून येते. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी तो नेहमीच हसत मुखाने तयार असतो हा massage खूप भाऊन जात आहे. तो अशा कामाला लागला आहे कि संध्याकाळी घरी येईल का नाही याच उत्तर कोणच देऊ शकत नाही. शेवटी आपल्या बायकोच्या अशा प्रगल्भ विचार व वागण्याला भारावून जाऊन पोलीस कॉन्स्टेबल जे पुट-पुटतो कि ‘या बायकांचं काहीच कळत नाही’ यातून समाजातील ज्या पुरुषांनी बायकांची ताकत, विचार, व कर्तृत्व स्वीकारून आपण दोघंही बरोबरीचेच आहोत हे मान्य केले आहे  हा massage उत्कृष्ट पद्धतीने मांडला आहे.

शेवटी एवढेच म्हणावेशे वाटते कि लॉक डाऊनच्या अशा कठीण प्रसंगी देशभरातील जेवढे खाकी वर्दीतील कामाला लागले आहेत त्याचं शब्दात कौतुक करणे कठीण आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहून पूर्ण घराची जबाबदारी उचलून त्यांना साथ देणाऱ्या सर्व स्त्रीयांना salute.   

Saturday, 25 April 2020

मॉब लिंचिंग (पार्ट – १)


मॉब लिंचिंग (पार्ट – १)
                                                                                      उत्तम मदने 
पालघर मधील मॉब लिंचिंगच्या घटनेमुळे महाराष्ट्राबरोबरच देशभरातील वातावरण खूप तापले आहे आणि यावर वेगवेगळ्या स्तरावर टीका होत आहे, व याला राजकीय, धार्मिक व जातीय रंग दिले जात आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देश्यात अशा स्वरूपाच्या घटना घडणे हे खूप गृहनास्पद आणि लाजिरवाणे आहे. मॉब लिंचिंगच्या अशा घटना महाराष्ट्रात घडणे हि काही नवीन गोष्ट नाही, परंतु कोणत्या कारणामुळे मॉब लिंचिंगच्या घटना कुणाबरोबर घडत आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे. आता पर्यंत बऱ्याच ठिकाणी धार्मिक भेदभाव व धार्मिक तिरस्कारातून घटना घडलेल्या आपण पाहिल्या आहेत, त्याच बरोबर जातीय भेदभाव व जातीय तिरस्कारातून हि मॉब लिंचिंगच्या खूप घटना घडत आहेत, आणि पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रातही हे खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे.

जातीय व धार्मिक संघर्षाच्या व तिरस्काराच्या माध्यमातून जमावाने केलेली हिंसा पाहिली तर शिख विरुद्ध १९८४, ख्रीश्चन आणि इतर विरुद्ध २००९, मुस्लिमांविरुद्ध - गुजरात २००२, मुझ्झापानगर २०१३, बक्सा २०१३  तसेच दलितानविरूद्ध खूप ठिकाणी झालेली दिसून येते. दलितांविरूद्ध ऐतिहासिक जातीय हिंसाचार, ज्यात बलात्कार, खून आणि इतर प्रकारच्या शारीरिक हल्ल्यांचा समावेश आहे. ‘Amnesty International, India च्या रिपोर्ट नुसार भारतातील अशा गुन्ह्याच्या ७०% गुन्हे हे मागासलेल्या, दलित व मुस्लीम समाजावर घडत आहेत.

अशा स्वरूपाच्या मॉब लिंचिंगच्या घटना का घडत आहेत? या पाठीमागे खरच काही राजकारण आहे का? का, लोकं खूप निर्दयी होत चालली आहेत? लोकांना कायद्याची खरच भिती राहिली नाही का? लोकं कायदा का हातात घेत आहेत? का, हे सर्व कोणी घडऊन आणत आहे? या सर्व प्रश्नावरती सखोल विचार करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर, आतापर्यंत महाराष्ट्रात अफवातून घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना पाहिल्या  तर यात बळी गेलेले लोकं कोण आहेत? आणि याच लोकांचा बळी का जात आहे? याचा विचार करणे हि खूप गरजेचे आहे.

गडचिंचले, पालघर घटना:
१६ एप्रिल २०२० रात्री ११.३० च्या दरम्यान दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक यांना जवळपास २०० लोकांच्या जमावाने दगड, काठ्या आणि सळयांनी ठेचून मारले. हि घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले या गावात घडली. जसा लॉक डाऊनचा  काळ सुरु झाला होता तसी या परिसरामध्ये whats app वर एक अफवा पसरत होती कि रात्रीच्या वेळी गावात साधू व डॉक्टर च्या वेशात लहान मुलांची किडनी चोरण्यासाठी लोकं/चोर येत आहेत. या घटनेत मारले गेलेले साधू सुरत ला त्यांच्याच परिचयातील एका साधूचा मृत्यू झाला होता म्हणून त्यांच्या अंत विधीसाठी चालले होते.

या साधूंची गाडी गडचिंचले या आदिवाशी गावात पोहोचताच तिथे लॉक डाऊन च्या काळात सुद्धा जमलेल्या  जवळ पास २०० लोकांच्या जमावाने गाडी आडवली व जमावाने या साधू व त्यांच्या गाडीच्या चालकाला मारण्यास सुरुवात केली. परिस्थिती खूपच गंभीर झालेली पाहून एका वन रक्षकाने तिथून जवळच असलेल्या कासा पोलीस ठाण्यात कॉल करून घडत असलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच कसलाही विलंब न करता पोलिसांच्या दोन सुमो गाड्या घटनास्थळी पोहचल्या. गडचिंचले गावात पोहचताच पोलिसांनी साधू व गाडी चालक यांना ताब्यात घेतले व गाडीत बसवले परंतु जमलेल्या जमावाने पोलिसांना न जुमानता पुन्हा साधू व गाडी चालकास आपल्या ताब्यात घेतले आणि दगड, काठ्या आणि सळयाने मारण्यास सुरुवात केले आणि आणि पोलिसांना न जुमानता त्यांना जीव जाई पर्यंत मारतच राहिले. हे साधू कोण होते तर ते होते गोसावी समाजे, कि जो समाज महाराष्ट्र मध्ये भटके-विमुक्त या सामाजिक प्र-वर्गात येतो.

राईनपाडा, धुळे घटना:
पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मागून जगणारे पाच ते सात कुटुंब धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यामधील पिंपळनेर गावाबाहेर रस्त्यालगत आपली पाल टाकून वास्तव्याला आली होती, व आजूबाजूच्या गावात भिक्षा मागून आपले जीवन जगत होती. १ जुले २०१८ रोजी या कुटुंबातील ७ सदस्य जवळच असलेल्या राईनपाडा या साक्री तालुक्यातील आदीवाशी लोकांच्या गावात भिक्षा मागण्यासाठी गेले होते आणि त्याच दिवशी त्या गावचा बाजार होता. याच भागामध्ये काही दिवसांपासून whats app वर एक अफवा पसरत होती कि लहान मुलांना चोरणारी व त्यांच्या किडन्या काढून विकणारी टोळी सक्रीय झाली आहे, अशा अफवांना  whats app वर पेव आला होता त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. राईनपाडा मध्ये बाजाराचा दिवस पाहून हे भिक्षेकरी तिथे भिक्षा मागण्यासाठी पोहचले आणि लोकांना या भिक्षेकारांबद्दल काय वाटले याचा अंदाज भिक्षेकारांना येण्याच्या अगोदरच स्थानिक लोकांनी भिक्षेकरी लोकांना मारण्यास सुरुवात केली. बाजाराचा दिवस असल्यामुळे लोकांचा जमाव मोठा झाला आणि त्यांनी भिक्षेकरींना लाथा, बुक्या, दगडाने मारण्यास सुरुवात केली. या सात भिक्षेकरी मधील दोघे जन पळून जाण्यास यशस्वी ठरले परंतु जे पाच लोकं जमावाच्या हाती लागली त्यांना मार-हान करत जमावाने गावच्या ग्रामपंचाय कार्यालयामध्ये कोंडून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर हि जमावाने ग्रामपंचायत कार्यालयात ठेवलेल्या लोकांना लाथा, बुक्या व दगडाने मारण्याचे बंद केले नाही. घटनास्थळी आठ पोलीस असतानाही जमाव पोलिसांना न जुमानता या भिक्षेकरींना मारतच राहिला आणि शेवटी यात भिक्षेकरी लोकांना पोलिसांच्या उपस्थितीत आपला जीव गमवावा लागला. हे भिक्षेकरी लोकं कोण होते? तर ते होते, नाथ पंती डवरी गोसावी समाजाचे कि जो समाज महाराष्ट्रात भटके-विमुक्त प्रवर्गामध्ये येतो. या हत्याकांडात मृत पावलेले लोकं सोलापूर मधील मंगळवेढा तालुक्यातील खावे गावचे रहिवाशी होते.

कळमना, नागपूर घटना:
कळमना या नागपूर भागामध्ये चार लोकं साडी घालून भिक मागण्यासाठी सुरवात करतात आणि त्याच वेळेस कळमना भागातील काही युवक त्या भागातील लोकांना अलर्ट करतात आणि या चार लोकांचा पाठलाग करायला सुरवात करतात. काही दिवसांपासून या भागात अफवा पसरत होती कि, काही लोकं महिलांचे दागिने चोरने, विनयभंग- बलात्कार करणे या साठी फिरत आहेत आणि याच संशयातून या युवकांनी यांचा पाठलाग करण्यास सुरवात केली. या पाठलाग करणाऱ्या युवकांच्या संखेत वाढ होत गेली आणि या जमावाने या लोकांना मारण्यास सुरवात केली. हि घटना पोलिसांना समजताच पोलीस तिथे दाखल झाले परंतु पोलिसांना न जुमानता या जमावाने चार पैकी तीन लोकांचा बळी घेतला त्यातील एकाला पोलीस व्ह्यान मध्ये घालण्यात यशस्वी ठरल्याने त्याचा जीव वाचला. हे मरण पावलेले लोकं कोण होते? तर ते होते बहुरूपी समाजातील कि जो समाज भटके-विमुक्त सामाजिक प्रवर्गात येतो. हे सर्व लोकं मुळचे मोदीपुर गाव बुलढाणा येथील रहिवाशी होते.

वरील तिन्ही घटना पाहिल्या तर त्यातील पहिल्या दोन घटनामध्ये खूपच साम्य आहे. ज्या गावांमध्ये ह्या घटना घडल्या ती गावे आदिवाशी गावे आहेत. ज्या लोकांना मरेपर्यंत मारले ते लोकं भटके-विमुक्त प्रवर्गातील आहेत आणि ज्या अफवानमुळे त्यांना मारले गेले त्या अफवा हि लहान मुल चोरणारी व त्यांच्या किडन्या विकणाऱ्या टोळ्या फिरत आहेत अशा स्वरूपाच्या अफवा आहेत. तिसऱ्या घटने मध्ये हि लोकांना मारले गेले तो भाग मात्र आदिवाशी नव्हता. परंतु अशा स्वरूपाच्या अफवातूनच तोही प्रकार भटके विमुक्त लोकांबरोबर घडलेला आहे. ज्या-ज्या परिसरात अश्या अफवातून मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत तिथे तिथे एक तर भटके-विमुक्त किंवा मागास प्रवर्गातील जातींच्या लोकांचाच बळी जात आहे.

सोशिअल मिडिया च्या माध्यमातून ज्या अफवा पसरत आहेत त्यांना बळी पडणारा लोकंसमुदाय कि ज्यांचा सोशीअल मीडियाशी तसा फारसा सबंध येत नाही कारण पोटाची खळगी भरणे हाच सर्वात मोठा प्रश्न अजून त्यांच्या समोर उभा आहे तो कसा सोडवावा याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. अशा अवस्थेत ते अजून सोशिअल मिडिया या प्रकारापर्यंत पोहोचूच शकले नाहीत किंवा तो प्रकार काय आहे हेच आजून कित्येकांना माहित हि नाही, परंतु त्याच सोशिअल मिडियाचा वापर करून बुद्धीचा वापर न करणार्यांमुळे आज त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे हे एक भयाण वास्तव आहे. अशा सोशियल मिडिया मधून पसरलेल्या अफवामधून ज्यांचा बळी जात आहे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या कुटुंबावर अजूनच भयंकर परिस्थिती ओढवत आहे व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

आता यातून सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो असा कि, अशा सोशिअल मिडिया मध्ये अफवा कोण तयार करत आहे व पसरवत आहे आणि का? खरच पोलीस या गोष्टीचा शोध घेऊ शकत नाहीत का? आपली सायबर यंत्रणा एवढी कुचकामी झाली आहे का?

या घटनांतून अजून एक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे या आदिवाशी बांधवांनी टोकाच्या भूमिकेला जाने. आदिवाशी बांधवांची संस्कृती, परंपरा व वैशिष्टे पाहिले तर आदिवाशी समुदाय हा लाजाळू आणि तसा फारसा इतर जगाशी संपर्कात न येणारा समुदाय, मंग या समुदायाकडे अशी टोकाच्या भूमिकेला जाणारी ताकद कुठून येते. समजा, अशे समजले कि या लोकांनी हे स्व: संरक्षणासाठी केले तर मंग या झालेल्या घटना पाहिल्या तर अशे दिसते कि घटना घडत असतानी पोलीस त्या ठिकाणी पोहचलेले आहेत (संरक्षणासाठी) तरीही पोलिसांच्या उपस्थितीत हा जमाव लोकांना जीव मरेपर्यत कसा काय मारू शकतो? का, त्यांना अशा घटना करण्यासाठी कोणी प्रवृत्त करत आहे? पोलीस उपस्थित असताना यावर काहीच एक्शन का घेऊ शकले नाहीत? लोकं कायदा का हातात घेत आहेत? त्यांना कायद्याची भिती राहिली नाही का? सोशिअल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणे व अशा घटना घडऊन कायदा कानून हातात घेणे, कायद्याची भिती नाहीशी करणे, पोलीस यंत्रणेला कुचकामी ठरवणे हे सर्व करण्यासाठी समाजातील काही मास्टर माईनड तर काम करत नाहीत ना? अशा स्वरूपाच्या घटना घडवणे व समाजात अराजकता माजवणे तेढ निर्माण करणे असा अजेंडा राबवला जात आहे का? अशा सर्व प्रश्नावर सामान्य जनतेने चिकित्सक पणे विचार करणे गरजेचे आहे.

 या समाज व्यवस्थेने भटक्या विमुक्तांना या समाजात जे स्थान दिले आहे व समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन समाज व्यवस्थेने तयार केला आहे यावर मात करून स्वत: ला विकास प्रवाहात आणणे हे त्याच्यासाठी खूप मोठे आव्हान निर्माण झाले आहे.  

(या राईटअप मध्ये उपस्थिती केलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे पार्ट – २ मध्ये विस्ताराने येतील)  







Monday, 13 April 2020

लॉकडाऊन मध्ये घरगुती/कौटुंबिक हिंसाचारात वाढ


उत्तम मदने

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पूर्ण देशभर लागू केला. या जनता कर्फ्युला पूर्ण देशभर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालन्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व लोकांना घरून काम करण्याचे व घरातून बाहेर न येण्याचे आव्हान करण्यात आले. काल दि. ११ एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मिटिंग मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व गांभीर्य लक्षात घेऊन हा लॉकडाऊन दि. ३० एप्रिल पर्यंत तसाच सुरु ठेवण्याचे आदेश दिले.

या लॉकडाऊनच्या कालावधी मध्ये वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून लॉकडाऊन मुळे जगाला आणि भारताला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल यावरती आपण सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा ऐकत आणि पाहत आहोत, तसेच लॉकडाऊन मुळे काही सकारात्मक गोष्ठी पण घडत आहेत जसे के सर्व प्रकारचे उद्योग धंदे, रस्त्यावर धावणारी वाहने इ. सर्व बंद असल्यामुळे वायू, जल, आणि ध्वनी प्रदुशनाबाबत पूर्ण जगभर पोझीटीव्ह चर्चा केली जात आहे. अशा या सर्व पोझीटीव्ह आणि निगेटिव्ह चर्चेमध्ये एक धक्का दायक विषय समोर येत आहे तो म्हणजे जगभरात घरगुती हिसाचार आणि बाल अत्याचाराच्या प्रमाणात झालेली वाढ.

द गार्डियन वीक्ली या साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, चीन मधील हुबेई प्रोविन्स मध्ये फेब्रुवारी महिन्यात घरगुती हिंसाचाराच्या  १६२ तक्रारींची नोंद झाली आहे कि जी गेल्या वर्षी फक्त ४७ होती. वान फी या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार घरगुती हिंसाचाराची ९०% कारणे हि कोविड – १९ च्या संबंधित आहेत. द गार्डियन वीक्ली या साप्ताहिकातील माहिती नुसार स्पेन देशात लॉक डाऊन ची अंमल बजावणी खूप काटेकोर पणे केली जात आहे आणि जो कोणी नियम मोडेल त्याला दंड आकारला जात आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये तिथे महिलाने जर अत्याचाराची तक्रार नोंदवण्यासाठी घर सोडले तर तिला दंड आकारला जाणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तेथील activist ने १९ मार्च रोजी घडलेली हिसाचाराची घटना सांगितली त्यानुसार वालेन्शियाच्या किनारी प्रांतात पतीने मुलांसमोर आपल्या पत्नीचा मर्डर केला. अशा प्रगत म्हणवणाऱ्या देशातहि महिलांना पुरुष प्रधानातेतून येण्याऱ्या अहंकार व हिंसाचाराला सामना करावा लागत आहे.

प्रसार माध्यमातून घरगुती अत्याचाराबद्दल प्रकाशित झालेली आकडेवारी पाहता असे लक्षात येते कि सर्वच देशांमध्ये घरगुती हिंसाचारामध्ये वाढ झाली आहे. यात स्पेन मध्ये लॉक डाऊन घोषित केल्याच्या नंतर अवघ्या पहिल्या दोनच आठवड्यात महिलांकडून मदत केंद्रावर मदतीसाठी नेहमीपेक्षा १८% जास्त दूरध्वनी कॉल आले. तर फ्रेंच पोलिसांनी टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराविरोधातील मदतीसाठी ३०% कॉल वाढल्याचे सांगितले आहे. इंग्लंड मध्ये मदतीसाठी २५% कॉल वाढले. ऑस्ट्रेलियामध्ये लॉक डाऊन च्या काळात घरगुती हिंसाचारापासून कशी सुटका करून घ्यावी हा गुगल वर सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे, हे गांभीर्य लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कौटुंबिक समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समुपदेशकांना या गंभीर समस्येवर काम करण्यासाठी १५ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सची तरतूद करून दिली आहे.

प्रगत देशातील हि हिंसाचाराची स्थिती पाहता या समस्येची जटिलता लक्षात येते.  भारतातहि या समस्येची पाळेमुळे खूप खोल रुजलेली आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानुसार २४ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० या ९ दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे ६९ तक्रारींची नोंद झाली आहे आणि हे प्रमाण एरवीपेक्षा जास्त आहे, परंतु भारतात परिस्थिती अशी आहे कि, अन्याय अत्याचार झाला तरी महिला समोर येत नाहीत व बोलत नाहीत, महिलांमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती नाही. लॉक डाऊन च्या काळात घरगुती हिंसाचाराची पोलीस स्टेशन ला तक्रार केली तर इतरत्र कुठे आसरा मिळण्याची शक्यता नाही, अशा परिस्थितीमध्ये पोलीस दखल घेतील कि नाही, तक्रार केलेली पतीला व सासरच्या लोकांना समजले तर छळात अजून वाढ होऊ शकते अशी भिती वाटणे, अश्या अनेक कारणांमुळे भारतात महिला हिंसाचार झाला तरी पुढे येऊन तक्रार नोंदवण्यास घाबरत आहेत असे असू शकते.

राष्ट्रीय महिला आगोयाने एका अभ्यासानुसार नमूद केल्याप्रमाणे देशात ७१% पुरुषांकडे मोबाईल फोन असतील तर स्त्रियांच्या बाबतीत ते प्रमाण ३८% एवढेच आहे, त्यात आणखीन साक्षरतेचे प्रमाण कमी, शिक्षित असल्या तरी technical बाबीत बऱ्याच महिला अजूनही मागासलेल्या अवस्थेत आहेत, इ-मेल वापरता न येणे, किंवा इतर माध्यमांचा वापर करता न येणे, अश्या खूप साऱ्या कारणांमुळे अजून हि बऱ्याच तक्रारी पत्राद्वारे आयोगाकडे येतात.
भारतातील महिलांची सामाजिक स्थिती पाहता महिला घरगुती हिंसाचाराबाबत अजून जागृतच नाहीत हे लक्षात येते. घरगुती हिंसाचार नेमक कशाला म्हणावे? घरगुती हिंसाचार होत असेल तर आपल्या सरंक्षणासाठी आपण काय करू शकतो? कोणाकडे तक्रार करू शकतो? या संदर्भात कायद्यांची काही तरतूद आहे का? अश्या खूप साऱ्या गोष्टींची खूप साऱ्या महिलांना माहितीच नाही आहे.

घरगुती हिंसाचार म्हणजे काय?
स्त्री ज्या परिवारासोबत वा साथीदारासोबत एकाच छताखाली राहत असेल आणि तिचा छळ मग तो शारीरिक छळ म्हणजे मारहाण, चावणे, ढकलणे, दुखापत करणे, वेदना देणे, लैंगिक छळ म्हणजे स्त्रीच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध समागम करणे, अश्लील फोटो काढणे, बिभत्स कृत्य करणे, अश्लील चाळे करणे, बदनामी करणे, तोंडी आणि भावनिक अत्याचार जसे अपमान करणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही होत नाही म्हणून टोमणे मारणे, घालून-पाडून बोलणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमानीत करणे, कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे, आर्थिक अत्याचारात हुंडय़ाची मागणी करणे, मुलांच्या पालन-पोषणासाठी पैसे न देणे, महिलेला औषध उपचार न करणे, नोकरी करण्यास मज्जाव करणे, असेल तर सोडण्यास सांगणे, प्रसंगी घरातून हाकलून देणे इ. प्रकारे स्त्रीला छळवाद सहन करावा लागतो.

शारीरिक छळ
शारीरिक छळात घरातील व्यक्तीकडून महिलेला मारहाण त्यात मंग तोंडात मारणे, लाथा मारणे, हात-पाय पिरगाळणे, केस ओढणे, चावणे, गुद्दे मारणे, ढकलणे, गरम वस्तूचे चटके देणे, किंवा इतर प्रकारे शाररीक दुखापत करणे, गळा दाबाने, मारण्यासाठी सुरा, चाकू, काठी, दाभण, भांडी, लोखंडाच्या इतर वस्तूंचा वापर करणे, अंगावर थुंकणे, रागात चिमटे काढणे इ. समावेश केला जातो.

लैंगिक अत्याचार
लैगिक अत्याचारांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो, यामध्ये महिलेच्या इच्छे विरुद्ध शारीरिक बळाचा वापर करून लैगिक संबंध करण्यासाठी तिच्यावर दबाव आणने हि प्रमुख गोष्ट असून यात विवाहांतर्गत बलात्कार, छेडछाड, इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श, सहेतुक लैंगिक भाषेचा वापर, आई-बहीणीवरून शिव्या, लैंगिक अवयवांना इजा, इच्छेविरुद्ध मोबाईलवरून अश्लील बोलणे व अश्लील चित्र, व्हिडीओ पाठविणे/दाखवणे, इच्छेविरुद्ध पॉर्न फिल्म दाखविणे, इच्छेविरुद्ध/त्यांना माहीत नसताना त्यांच्याच लैंगिक अवयवांचे फोटो काढणे व इतर अनेक प्रकारे नियंत्रण/बंधन घालणे इ. समावेश होतो.

तोंडी आणि भावनिक अत्याचार
तोंडी आणि भावनिक अत्याचार जसे अपमान करणे, वाईट नावाने बोलावणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही म्हणून अपमान करणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे. महिलेला किंवा तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यास मज्जाव करणे, नोकरी स्वीकारण्यास व करण्यास मज्जाव करणे, स्त्रीला व तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला घरामधून बाहेर जाण्यास मज्जाव करणे, नेहमीच्या कामासाठी कोणत्याही व्यक्तीबरोबर भेटण्यास मज्जाव करणे, महिलेला विवाह करावयाचा नसल्यास विवाह करण्यास जबरदस्ती करणे, महिलेच्या पसंतीच्या व्यक्ती बरोबर विवाह करण्यास मज्जाव करणे, त्याच्या अथवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास जबरदस्ती करणे, आत्महत्येची धमकी देणे इतर कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे यांचा समोवश होतो.

आर्थिक अत्याचार
आर्थिक अत्याचारात हुंडयाची मागणी करणे, महिलेच्या किंवा तिच्या मुलांचे पालन पोषणासाठी पैसे न देणे, महिलेला किंवा तिच्या मुलांना अन्न, वस्त्र, औषधे इत्यादी न पुरविणे, नोकरीला मज्जाव करणे, नोकरीवर जाण्यासाठी अडथळा उत्पन्न करणे, नोकरी स्वीकारण्यास संमती न देणे, पगारातून रोजगारातून आलेले पैसे काढून घेणे, महिलेला तिचा पगार, रोजगार वापरण्यास परवानगी न देणे, राहात असलेल्या घरातून हाकलून देणे, घराचा कोणताही भाग वापरण्यास किंवा घरात जाण्यास, येण्यास अडथळा निर्माण करणे, घरातील नेहमीचे कपडे, वस्तू वापरण्यापासून रोखणे, भाड्याच्या घराचे भाडे न देणे या बाबींचा समावेश होतो.
अशा सर्व प्रकारच्या घटना जर महिलांबरोबर घडत असतील तर त्या सर्व घरगुती/कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात, याची महिलांना प्रकर्षाने जाणीव करून देणे गरजेचे आहे.

समाजामध्ये महिलेने चूल-मुल सांभाळणे व मुलांना जन्म देणे यापलीकडे तिचे अस्तित्वच नाही अशी धारणा अजूनही आहे. या धारणेला गरीब, श्रीमंत, जात, धर्म, पंथ, शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, नोकरीवाली, बिगर नोकरीवाली असा कुठलाही अपवाद नाही, स्त्री-पुरुष समानता कायद्याने मान्य केलेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम १४ नुसार भेदभावापासून मुक्ती, कलम १५ अन्वये स्त्री-पुरुष समानता, कलम २१ प्रमाणे जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क कायद्याने महिलानाही दिला आहे. एवढे बरेच काही नियम असताना सुद्धा महिला कौटुंबिक हिंसाचारास बळी पडतात. अशा या कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने २००५ साली “कौटुंबिक हिंसाचार कायदा – २००५” अस्तित्वात आणला. या कायद्याची अंमलबजावणी २६ ऑक्टोंबर २००६ पासून सुरु करण्यात आली. त्याचबरोबर कौटुंबिक न्यायालय कायदा १९८४ नुसार भारत सरकारने ठीक-ठिकाणी कौटुंबिक न्यायालये स्थापन केली आहेत तसेच विवाह समुपदेशक यांची मदत न्यायाधीशांना उपलब्ध केली आहे व न्यायालयात होणारे समुपदेशन सक्तीचे करण्यात आले आहे. वर नमूद केलेले हिंसाचार जर महिलांबरोबर होत असतील तर महिलेने काय करावे.....
  • महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर महिलांनी १०३ या क्रमांकावर फोन केल्यास पोलिसांकडून तातडीने मदत मिळू शकते

  • स्त्रियांसाठी अनेक समाजसेवी संस्था, NGOs काम करत आहे, तसेच राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग महिलांच्या विविध प्रश्नावर काम करतात.

अशा या कौटुंबिक हिंसाचाराला केवळ महिलाच बळी पडतात असे नाही तर कित्येक पुरुष हि बळी पडत आहेत, बरेच पुरुष व त्यांचे कुटुंबीय ‘कौटुंबिक हिंसाचार’ कायद्यांतर्गत खोट्या आरोपांमध्ये अडकलेले आहेत.  परंतु कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महिलांच्या प्रमाणापेक्षा पुरुषांचे प्रमाण खूपच कमी आहे. अजून तरी पुरुषांसाठी कोणताच कायदा नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये पुरुष ‘पुरुष हक्क संरक्षण समिती’ किंवा ‘सेव्ह इंडिया फमिली फाउंडेशन’ सारख्या संस्थांची मदत घेऊ शकतात.

 स्त्री-पुरुष समानता कायद्याने मान्य केलेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम १४ नुसार भेदभावापासून मुक्ती, कलम १५ अन्वये स्त्री-पुरुष समानता, कलम २१ प्रमाणे जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क कायद्याने महिलानाही दिला आहे. समानतेच जीवन जगन, प्रतीष्टेने जगणे, हिंसामुक्त जगणे, निरोगी जीवन जगणे हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे आणि स्त्रियांचे असे सर्व अधिकार अबाधित राहणे हि सर्व समाजाची जबाबदारी आहे.

Note: This Article has published in 'Baramati Zatka News Channel' on 12.04.2020. 

Monday, 6 April 2020

‘विद्यादेवी’ सावित्रीबाई रोडे: सत्यशोधक चळवळ आणि रामोशी शिक्षण परिषदा


                                                                                            उत्तम मदने

भारत देशाचा इतिहास जर आपण पहिला तर भारत देश वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या बदलातून पुढे आलेला दिसतो. असाच मोठा बदल १८१८ च्या कालखंडात चालू झाला, या कालखंडात ब्रिटीशांनी पेशव्यांची सत्ता हस्तगत करून भारतात स्वत: चा अंमल सुरु केला. ब्रिटिशांनी स्वत:ची प्रशासकीय व्यवस्था भारतात राबवायला सुरवात केली आणि त्याच बरोबर भारतात आधुनिक शिक्षणास सुरवात झाली आणि दरम्यानच्या काळात समाज सुधारकांची एक फळी तयार होऊ लागली आणि पुनर्जागरण चळवळ वेग घेऊ लागली. यातूनच पुढे महाराष्ट्रात १८४८ मध्ये ‘स्टुडंट लिटररी एण्ड सायंटिफिक सोसायटी’ ची स्थापना शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झाली. यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून भाऊ दाजी लाड, गो. ग. आगरकर, धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, म.गो. रानडे इ. समाज सुधारकांनी पुनर्जागरण चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली परंतु या चळवळीमध्ये दोन विचारांचे दोन गट पाहायला मिळतात एक गट ‘प्रस्थापित व्यवस्थेच्या चौकटीत राहून सुधारणावर विश्वास ठेवणारा’ तर दुसरा गट ‘संपूर्ण व्यवस्था परिवर्तनावर विश्वास ठेवणारा’ होता.  त्यामध्ये समाज परिवर्तनासाठी झगडणाऱ्या समाज सुधारकांना प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरुद्ध लढा द्यावला लागलाला आणि या लढ्यामध्ये सर्वात पुढे होते ते म्हणजे महात्मा फुले. अशा स्वरूपाचा लढा देणे एकट्याने शक्ये नाही हे जाणून त्यांनी १८७३ रोजी पुणे येथे “सत्यशोधक समाजाचची” स्थापना केली.

सत्यशोधक समाजामार्फत सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जातींमध्ये शिक्षणाचा प्रसार घडून आणणे, सर्व प्रकारचे धार्मिक विधी ब्राह्मण पुरोहिताशिवाय करणे, बहुजन समाजातील सामान्य लोकांना ज्योतिष,  भूतपिश्याच्य, जादूटोणा यासारख्या गोष्टींच्या भीतीपासून मुक्त करणे अशी कामे चालू केली. हि कामे चालू झाल्यानंतर विविध जातीचे लोकं समोर येऊ लागली व महात्मा फुले यांचे अनुयायी बनू लागले. अश्याच खूप साऱ्या अनुयायांमध्ये दोन अनुयायी होते ते म्हणजे धोंडीबा रोडे आणि धोंडीराम कुंभार[1].  महात्मा फुलेंचे अनुयायी बनण्यापाठीमागे या दोघांचा मोठा इतिहास आहे, १८५६ मध्ये सनातनींच्या कटकारस्थानाला बळी पडून हे दोघेही महात्मा फुलेंना मारण्यासाठी आले होते त्यावेळेस महात्मा फुलेंनी अतिशय सय्यमाने आपण काय काम करत आहोत व ते का करत आहोत हे त्यांना सांगितले आणि त्यातून त्यांना वास्तव परिस्थितीच जाणीव झाली व दोघांनी हि इथून पुढे महात्मा फुलेंबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला व ते त्यांचे अनुयायी बनले. पुढील कालावधीमध्ये धोंडीबा रोडेंचा मुलगा व सुनबाई तात्याबा रोडे व सावित्रीबाई रोडे हे दोघेही सत्यशोधक चळवळीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर काम करू लागले. हे रोडे दाम्पत्ये महात्मा फुलेंनी जे सत्यशोधक समाजाचे काम हाती घेतले होते ते पुढे नेण्यामध्ये कसोशीने प्रयत्न करत होते, यामध्ये विवध ठिकाणी जाऊन बहुजन समजामध्ये ते शिक्षांचा प्रसार  करत होते, बहुजन समाजाला वाईट चाली-रिती, रूढी परंपरा मधून बाहेर काढून वास्तवाची जाणीव करून देण्याचे काम करत होते. या काळामध्ये विविध ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या परिषदा होऊ लागल्या आणि यातीलच एका परिषदेचे अध्यक्ष स्थान सावित्रीबाई रोडे यांनी भूषविले आहे[2].

सावित्रीबाई रोडे या भटक्या विमुक्त समाजामधील अतिशय उपेक्षित समजल्या जाणाऱ्या रामोशी समाजा मधून येतात. १८७१ साली ब्रिटीश सरकारने भारतात गुन्हेगारी जमाती कायदा अस्तित्वात आणला आणि भारतातील १९३ जाती-जमाती व महाराष्ट्रातील १४ जाती-जमाती या कायद्यान्वये जन्मजात गुन्हेगार ठरल्या गेल्या[3]. भारतातील व महाराष्ट्रातील या प्रमुख जाती-जमाती मधील काही जाती-जमातीच्या उप-जाती खूप साऱ्या आहेत. रामोशी समाज महाराष्ट्रात सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

सावित्रीबाई तात्याबा रोडे या वास्तव्यास ७१०, भवानी पेठ, पुणे येथे होत्या व १९२२ मध्ये त्या पोलीस लाईन, शुक्रवार पेठ, पुणे येथे स्थलांतरित झाल्याच्या नोंदी सापडतात[4]. सत्यशोधक समाजाच्या विवध ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या सातत्याने सहभागी होऊन वेगवेगळ्या पातळीवर काम केले. अधिवेशनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावर निबंध सादर केले. त्यांच्या निबंधाचे विषय म्हणजे ‘शिक्षण, विद्या शिकल्याचे फायदे, अशे शिक्षण व बहुजन समाजाच्या परिस्थितीला धरून असत. हे सर्व काम करत असतानी आपण रामोशी सामाज्याची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करावे या विचारातून रामोशी समाज्याच्या शैक्षणिक विकासावर भर दिला पाहिजे हे त्यांना प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनी रामोशी समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्याचे  काम चालू केले. त्यांनी रामोशी समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी ‘क्षत्रिय रामोशी संघ’ पुणे या नावाची संस्था स्थापन केली[5]. या संस्थेमार्फत त्यांनी खेडो-पाडी जाऊन रामोशी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाचे काम चालू केले, पुढे जाऊन हे काम भरभराटीला आले आणि समाज बांधवांचा या कामासाठी भरभरून प्रतिसाद मिळू लागला हे पाहून त्यांनी सत्यशोधक समाजाच्या धरतीवरच आपण हि रामोशी समाज्याच्या क्षत्रिय रामोशी संघ व सत्यशोधक सामाज्यातर्फे परिषदा घेणे गरजचे आहे हे लक्षात घेतले व पहिली रामोशी शिक्षण परिषद १९१९ रोजी मुक्काम देवराष्ट्रे, तालुका – खानापूर, जिल्हा- सातारा येथे घेतली. मे १९२० साली दुसरी प्रांतिक रामोशी शिक्षण परिषद चिंचवड, पुणे येथे घेतली. त्याचबरोबर पुढील शिक्षण परिषदा १९ नोव्हेंबर १९२१ साली घेण्यात आली. नंतरची रामोशी शिक्षण परिषद १७ मे १९२२ रोजी मुक्काम पेठ, तालुका वाळवे, जिल्हा सातारा येथे घेतली.

या सर्व शैक्षणिक परीशदामध्ये समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्व व व्यसनाचे दूरगामी परिणाम यावरती चहूबाजूंनी चर्चा घडत होत्या. अशा प्रकारच्या रामोशी शैक्षणिक परिषदा भरवून आणणे व लोकांपर्यंत शिक्षणाचे महत्व पोहचवणे व हे सर्व काम करण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि तळमळ पाहता दुसऱ्या शैक्षणिक परिषदेतील लोकांनी एकमुखाने सावित्रीबाई रोडे यांना ‘विद्यादेवी’ म्हणून संबोधिले. या शैक्षणिक परिषदांमध्ये शैक्षणिक सुधारणे बरोबरच इतरही छोटे मोठे समाज सुधारणे संदर्भात ठराव सहमत करण्यात येत होते. यामध्ये शैक्षणिक सुधारनेबरोबर सर्व प्रकारचे धार्मिक विधी ब्राह्मण पुरोहिताशिवाय करणे, रामोशी समाजातील सामान्य लोकांना ज्योतिष,  भूतपिश्याच्य, जादूटोणा यासारख्या गोष्टींच्या भीतीपासून मुक्त करणे असेही ठराव असत. विद्यादेवी सावित्रीबाई रोडे यांच्या या कार्यकर्तृत्वातून रोमोशी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक स्थितीत बदल घडू लागले. अश्या या विद्यादेविला व तिच्या कार्याला सलाम.



[1] Ugale, G. A. (2006). विद्यादेवी सावित्रीबाई रोडे. वसंतराव फाळके.सातारा
[2] Ugale, G. A. (2006). विद्यादेवी सावित्रीबाई रोडे. वसंतराव फाळके. सातारा
[3] Rathod, M. (2000). Denotified and Nomadic Tribes in Maharashtra. DNT Rights Action Group, 1–6
[4] Ugale, G. A. (2006). विद्यादेवी सावित्रीबाई रोडे. वसंतराव फाळके. सातारा
[5] चव्हाण, आर. (nd). रामोशी, मानवशास्त्र, मराठी विश्वकोश

Saturday, 4 April 2020

कोरोना व्हायरस आणि भटके विमुक्तांची फरफट

उत्तम मदने 

जगाचा आणि भारताचा प्राचीन काळापासून चा इतिहास पहिला तर जग आणि भारत खूप साऱ्या संकटांना सामोरे गेले आहेत, मंग यात परकियांची आक्रमणे असूद्यात कि नैसर्गिक संकटे असूद्यात. जगाने आणि भारताने खूप वेळा वेगवेगळ्या महामारींना तोंड दिल आहे, १९१० मधला कॉलरा, १९१८ मधला स्पनिश प्ल्यु, १९५७ मधला एशियन प्ल्यु, १९६८ मधला होंककोंग प्ल्यु, १९८१ आणि २००५-२०१२ मधल एच.आय.व्ही. एड्स, २००९ मधला स्वाइन प्ल्यु, २०१५-१६ मधला एबोला, आणि आता पूर्ण जग आणि भारत ज्याला तोंड देत आहे असा कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस चा उगम हा चीन मधला समजला जात आहे, परंतु कोरोना व्हायरसच्या उगमाला धरून वेगवेगळे विचार व मते प्रसार माध्यमातून जनतेसमोर येत आहेत आणि यातच अमेरिका आणि चायना आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारनाची पोळी भाजून घेत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमातून समोर आलेल्या माहिती नुसार कोरोना व्हायरसचा चीनमधील हुबई प्रांतातील वूहान शहरात उगम झाला. वूहान शहरामध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना पिडीत रुग्ण निदर्शनास आले. चीनमधील ‘साउथ चायना मोर्निंग पोस्ट’ हे संकेतस्थळ असा दावा करत आहे कि चीन मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १७ नोव्हेंबर २०१९ मध्ये आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू.एच.ओ.) अहवालानुसार कोरोना व्हायरस चा पहिला पोझिटिव्ह रुग्ण ८ डिसेंबर २०१९ रोजी नोंदवला गेला. ‘द लंन्सेंट’ या वैदिकीय मासिकातील माहितीनुसार वूहान झीयिताण या रुग्णालयात पहिला कोरोना व्हायरस चा रुग्ण १ डिसेंबर २०१९ मध्ये सापडला. डिसेंबर २०१९ पासून ते मार्च २०२० पर्यंत हा हा म्हणतां कोरना व्हायरस ने जवळपास १५० हून अधिक देशांना विळखा घातला आणि पूर्ण जग याबद्दल खूपच चिंतीत गेले आणि बऱ्याच देशांनी कोरोना ला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला. यानुसार भारत सरकारने हि २२ मार्च २०२० ला लॉकडाऊन घोषित केला आणि त्याला १०० टक्के प्रतिसाद जनतेकडून मिळाला. आरोग्य क्षेत्रातील व डब्ल्यू.एच.ओ. च्या तज्ञ मंडळीनुसार जो पर्यंत लस शोधण्याच काम चालू आहे तोपर्यंत लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे त्यानुसार कोरोना व्हायरस वर आळा घालण्यासाठी भारत सरकारने लॉकडाऊन पुढे कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात लॉकडाऊन सुरु झाला. कोरोना वर आळा घालण्यासाठी लॉकडाऊन चा जो निर्णय घेतला गेला तो स्वगातःर्याच आहे परंतु लॉकडाऊन लागू करण्याच्या अगोदर जी काही थोडीफार पूर्व तयारी करण अपेक्षित होती किंवा लोकांची मानशिक तयारी करण्याची जी गरज होती ती कुठेतरी पूर्ण झाली नाही हे लक्षात आले. कारण २४ मार्च च्या लॉकडाऊन नंतर अशी सर्व लोकं कि ज्यांचे पोट तळहातावर आहे आणि ते भरण्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत  झाले आहेत मंग यात बांधकाम मजूर, असूद्यात, हमालाची काम करणारे मजूर असूद्यात किंवा इतर कोणत्याही असंघटीत क्षेत्रातील मजूर वर्ग असूद्यात हे सर्व मजूर वर्ग २४ मार्च नंतर आपल्या गावाच्या वाटेवर झुंडींनी चालत बाहेर पडलेले आपण पहिले. सर्व मजूरवर्ग ४०० ते ५०० कि.मी. चालत चालले होते आणि चालत असतानी न पाणी व अन्न बरोबर होत हि सर्व प्रसार् माध्यमातून जे दाखवलं जात होत ती न पहावणारी परिस्थिती होती आणि त्यात दुसरी मोठी गोष्ट म्हणजे लोकं एकत्र येऊ नये म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि लॉकडाऊन मुळेच कुठेतरी लोकांच्या झुंडी च्या झुंडी रस्त्यावर आल्या. असे हे डोळ्यांच्या कडा ओले करणारे चित्र आपण प्रसार माध्येमामध्ये पाहिले परंतु याच्या व्यतिरिक्त देश्यामध्ये ज्यांना घर नाही आणि जे उघड्यावरच शहरात किंवा ग्रामीण भागात जिथे जागा मिळेल तिथे राहतात अशी खूप मोठी लोकसंख्या देश्यामध्ये आहे. या लोकसंखेमध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो भटके विमुक्त लोकसंखेचा, National commission for De-notified, Nomadic and Semi-nomadic tribes च्या अहवालानुसार देशाच्या एकूण लोकसंखेच्या ७% लोकसंख्या भटके विमुक्त समुदायाची आहे. स्वातंत्र्ये मिळून सत्तर वर्ष होऊन गेली तरी हि अजून हा सर्व समुदाय भटक्या अवस्थेतच जगत आहे आणि आपल्या उदर निर्वाहासाठी गावोगावी व शहरामध्ये भटकत आहे. आपले पारंपारिक व्यवसाय करून हा समुदाय आपला उदर निर्वाह करत आहे. भटके विमुक्त समुदायाच्या पारंपारिक व्यवसायाचे स्वरूप पाहिले तर ते भटकंती करूनच केले जाणारे व्यवसाय आहेत परंतु खरा विचार करण्याची गरज आहे ती अशा व्यवसायांमुळे ते भटकंती करू लागले कि भटकंतीमुळे असे व्यवसाय करणे त्यांना भाग पडले? असो. हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे.

देशामध्ये लॉक डाऊन जाहीर झाला आणि ज्या बिकट अवस्थेत भटके विमुक्त समाज जगत होता त्यांची ती अवस्था अजूनच बिकट झाली. कारण, लॉक डाऊन मुळे सर्व शहरे आणि गाव बंद झाली त्यामुळे  या लोकांचे व्यवसाय बंद पडले कि जे करून ते आपल हातावरच पोट गावोगावी व शहरोशेहरी फिरून भरत होते. पूर्वीच्या काळापासूनच या समुदायाला स्वता: च अस घर नाही कि जमीन नाही. हातावरच पोट भरण्यासाठी एका गावात चार दिवस तर लगचे तिथून दुसऱ्या गावी चार दिवस असा यांचा भटकंतीचा क्रम राहतो आणि त्यातह सर्वच ठिकाणी त्यांना गावाकडून प्रतिसाद मिळतोच असे नाही. काही गावांमध्ये या समुदायाच्या लोकांन्ना येऊ हि दिल जात नाही. ज्या गावात हे जातात तिथेच गावाच्या बाहेर चार दिवस वस्ती करून राहतात.
     ठिकाण: सावदा रोड, फैजपूर (पाल टाकून तात्पुरती राहण्यासाठी केलेली सोय)
अगोदरच समाज व पोलीस प्रशासन या समुदायंकडे गुन्हेगारीच्या नजरे पाहत आहे आणि हे पाहन गुन्हेगारी जमाती कायदा १८७१ च्या अस्थित्वात येण्या पासून चालू आहे ते आजही संपुष्टात येऊ शकले नाही हीच एक मोठी शोकांतिका आहे. कोरोना व्हायरस चा प्रसार होत आहे आणि गावात बाहेरून येणाऱ्या लोकांना मज्जाव करण्यासाठी गावो-गावी गावाच्या वेशी बंद करण्यात आल्या कि जे एक कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावकऱ्यांनी उचलले चांगले पाउल आहे परंतु यात असे दिसून आले कि ज्या लोकांना गावचं नाही, घर नाही, जमीन नाही अशा ७% लोकसंखेने कुठे जायचं? काय खायचं? कुठे राहायचं? आणि या सर्वांनबाबाद कोणाला विचारायचं व कोणाकडे तक्रार करायची? हे सर्वात मोठे प्रश्न आज त्यांच्या समोर आहेत. भटके हे सतत आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने गावो-गावी व शहरो-शहरी भटकत राहतात त्यामुळे यांच्याकडून कोरोना चा प्रादुर्भाव होण्याची भिती स्थायिक झालेल्या लोकंमध्ये वाढतंच चालली आहे. याकारणास्तव कोनत्याच गावात यांना थारा दिला जात नाही आणि सर्व बंद असल्यामुळे ते आपला व्यवसाय करून उदर निर्वाह हि करू शकत नाहीत. अशा उपासमारीत आपल्या मुला बाळांना कस जगवाव असा महामारीपेक्षा हि मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. कोरोनाची लागण होऊन मरण्याऐवजी कोरोना मुळेच उपाशी पोटी मरण्याची वेळ भटक्या विमुक्त समुदायावर आली आहे.

लॉक डाऊन मुळे गावोगावच्या वेशी झाल्या बंद (whatsaap ग्रुप वरील फोटो )
लॉकडाऊन मुळे गावो-गावी चालत  निघालेल्या लोकांची स्थिती लक्षात घेऊन खूप सारी लोकं मदतीसाठी पुढे सरसावली, त्यांच्यासाठी खाण्याची, राहण्याची सोय बऱ्याच ठिकाणी करून देण्यात आली, या सार्वांमध्ये पोलिसांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली  आणि यातूनच माणुसकी दिसून आली परंतु हे जे सर्व पाहायला मिळाले ते शहरांच्या ठिकाणी परंतु ग्रामीण भागातील भटक्या विमुक्त समुदायाच काय? यांची सोय कोण करून देणार? ज्यांची पोट हातावर आहे अश्या लोकांसाठी केंद्र सरकारने लगेच मदतीची घोषणा केली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक लाख ७० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, ज्यामार्फत सर्वसामान्यांना वेगवेगळ्या मार्गांनी मदत दिली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की पंतप्रधान जनधन खात्यांतर्गत बँक खाते असलेल्या सुमारे २०.५ कोटी महिलांना पुढील तीन महिन्यांकरिता दरमहा ५०० रुपयांची मदत दिली जाईल. ही रक्कम प्रत्येक महिन्यात या महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील ८.५ कोटी बीपीएल कुटुंबांना येत्या तीन महिन्यांत मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत साडेआठ कोटी महिलांच्या नावे गॅस जोडणी उघडण्यात आली होती. आता त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्यात येतील असं मोदी सरकारकडून सांगण्यात आलं आहेत. तसेच प्रधानमंत्री अन्न योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांत ५ किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ उपलब्ध होईल.  ८० कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त १ किलो मसूरची तरतूद करण्यात आली आहे, हे सर्व धान्य नागरिकांना मोफत मिळणार आहेत. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे की या लॉकडाऊनच्या काळात सरकार गरिबांना १.७० लाख कोटींची मदत करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले की पीएम गरीब कल्याण योजनेंतर्गत महिला बचत गटांतर्गत दीन दयाळ राष्ट्रीय ग्रामीण आजीविका योजनेंतर्गत ७ कोटी कुटुंबांना लाभ देण्यात येणार असून त्यांची दुप्पट रक्कम २० लाखांपर्यंत जाईल. याच बरोबर वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हि मदतीची घोषणा केली. सरकाने हे गोरगरीबांसाठी उचललेले खूप चांगले पाउल आहे.

परंतू, केंद्र सरकार व राज्य सरकारने गोरगरीबांच्या मदतीसाठी खूप चांगले पाउल उचलले असले तरी प्रश्न उरतो तो ज्यांच्याकडे घर नाही व जे कोणत्याच गावचे रहिवाशी होऊ शकले नाहीत असे भटके विमुक्त समुदायातील लोकं. National commission for De-notified, Nomadic and Semi-nomadic tribes च्या अहवालानुसार अजून देशातील खूप साऱ्या भटक्या विमुक्त लोकांकडे रेशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, मंग या लोकांनी कोणत्या बेस वर सरकारने घोषित केलेल्या मदतीचा लाभ घ्यायचा आहे?. गाव नाही, घर नाही तर मंग ह्या समुदायाची लोकं जनधन खाते कुठे काढतील?, घर नाही, रेशन कार्ड नाही तर मंग उज्वला गॅस जोडणी कुठून घेतील?. कोणत्याच गावचे रहिवाशी नसल्यामुळे यांना प्रधानमंत्री अन्न योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांत ५ किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ उपलब्ध होणार आहे हा कोण देईल? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे की या लॉकडाऊनच्या काळात सरकार गरिबांना १.७० लाख कोटींची मदत करणार आहेत, या १.७० लाख कोटींन मधल खरच किती पैसे भटके विमुक्त समुदायाच्या वाट्याला येतील हा न सुटणारा व उमजणार प्रश्न आज भटके विमुक्त समुदायासमोर पडला आहे.

महाराष्ट्रातील काही संस्था संघटना व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक निवेदन पाठून भटके विमुक्त समुदायाच्या  प्रश्नाकडे या लॉकडाऊन च्या काळात लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे. आता यावर सरकार कडून काय पावले उचलली जातील याकडे भटके विमुक्त समुदायाचे डोळे लागले आहेत.

Note: This article has published in 'Live Trends News' on 03.04.2020. Link: https://livetrends.news/?p=66539