About me

Friday, 1 May 2020

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन


महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन........
उत्तम मदने
महाराष्ट्र दिन:
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली आणि हाच दिवस आपण “महाराष्ट्र दिन” म्हणून साजरा करतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास जर थोडक्यात पाहिला तर तो अंगावर शहारे आणणारा आहे. १६ जानेवारी १९५६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा केली कि, मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल, परंतु या घोषणेनंतर पूर्ण महाराष्ट्र खवळून उठला व महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उठल्या. या प्रतिक्रिया म्हणजे १६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान मोठे दंगे झाले आणि पूर्ण महाराष्ट्र पेटत राहिली. मराठी माणसाच्या मनात हि आग अशीच धग-धगगत होती. यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाने (State Reorganization Commission) महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटला. मराठी माणसाने सर्वत्र निषेध नोंदवायला सुरुवात केली.
सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून महाराष्ट्राला मुंबई न देण्याच्या निर्णयाचा निषेध होत होता. अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या सभातूनच एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाऊंटन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया जनसमुदायातून उमटू लागल्या. या फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमलेल्या जनसमुदायाला पांगवण्यासाठी जनसमुदायावर लाठी चार्ज करण्याचे आदेश दिले गेले परंतु संतप्त जनसमुदाय या लाठी चार्ज ला न जुमानता तो सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया नोंदवतच राहिला, शेवटी ना विलाजाने पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश दिले गेले आणि या जनसमुदायावर गोळीबार करण्यात आला. या झालेल्या गोळीबारात, १०५ आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला आणि ते संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी हुतात्मे झाले. या हुतात्म्यांनी दिलेल्या बलीदानापुढे व मराठी माणसाच्या सतत चालू असलेल्या आंदोलनापुढे शेवटी सरकारने नमते घेतले व १ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. आणि त्या जागी हुतात्मा स्मारकाची स्थापना करण्यात आली.

अशा या प्रकारच्या परखड प्रयत्नानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. 

आंतरराष्ट्रीय/जागतिक कामगार दिन:
जगभरात जवळपास ८० पेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय/जागतिक कामगार दिन १ मे रोजी केला जातो. आंतरराष्ट्रीय/जागतिक कामगार दिनाचा इतिहास जर थोडक्यात पाहिला तर, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर लोकांना काम व रोजगार मोठ्या प्रमाणात मिळू लागला, हि एक चांगली गोष्ट औद्योगिक क्रांती मुळे घडू लागली परतू दुसऱ्या बाजूला कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होऊ लागली. कामगारांना कोणत्याही सोयी सुविधा न देता व त्यांना कामाच्या बदल्यात कमी वेतन देऊन १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. या पीळवनुकीविरुद्ध कामगारांनी कामगार लढा उभा केला व कामगार संघटनाची स्थापन करून प्रत्येक कामगाराला ८ तासच काम असावे अश्या स्वरूपाच्या मागण्या लाऊन धरल्या, परंतु कारखानदार वर्ग व सरकार या लढ्याला जुमानले नाही. शेवटी, १ मे १९८६ रोजी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून अमेरिकेतील शिकागो मधले कामगार संपावर गेले आणि त्यांनी भव्य आंदोलन छेडले व मोर्चा काढला, बघता-बघता शिकागो मधील सर्व कारखाने बंद झाले आणि सर्व कामगारांनी आंदोलनात सहभागी होऊन मोर्चाला प्रचंड प्रदिसाद दिला. एकत्र आलेला कामगारवर्ग पाहून उद्योजक व शिकागो शहराचे प्रशासन यांनी हे आंदोलन दडपण्याचा कसोशीने  प्रयत्न केला.  उद्योजक व शिकागो शहराचे प्रशासनाने अशे प्रयत्न करूनही कामगारांनी आंदोलन बंद केले नाही आणि आणि शेवटी ३ व ४ मे रोजी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. ४ मे रोजी शिकागो मध्ये चाललेल्या कामगारांच्या सभेमध्ये पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात काही लोकं मृत्यू मुखी पडले तर खूप सारे लोकं जखमी झाले. या वेळेस पोलिसांनी काही लोकांना अटक केली आणि यातील काही लोकांना पुढे फाशीची शिक्षा हि झाली.

या अशा भयंकर घटने नंतर ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर’ या कामगार संघटनेने १ मे हा दिवस “कामगार दिवस” म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. आणि जगभर हा दिवस “कामगार दिवस” म्हणून साजरा होऊ लागला.

भारतात पहिल्यांदा कामगार दिवस १ मे १९२३ रोजी “लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान” या संघटनेने चेन्नई येथे आयोजित केला.

भारतातील कामगारांना न्याय मिळवून देण्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा. भारतात हि कामगारांचा आंदोलने संप या माध्यमातून संघर्ष सुरूच होता, कामगार सतत आंदोलने संप करत होती, परंतु त्यांना त्यातून फारसे यश मिळत नव्हते आणि खरा दोष हा भांडवलदार वर्गातच आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी बरोबर ओळखले होते.  स्वत:च्या हक्कासाठी आंदोलन करणे, संप करणे या स्थितीला अपराध समजून मालक वर्गाने कामगार वर्गाची आणखीन पिळवणूक करण्यास सुरवात केली आणि कामगार व मालक यांच्यात १९३८ मध्ये मोठा कलह सुरु झाला आणि यातूनच मुंबई विधी मंडळात औद्योगिक कलहाचे विधेयक चर्चेसाठी मांडले गेले. चर्चेसाठी मांडलेल्या या विधेयकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जमनादास मेथा यांनी विरोध केला कारण या विधेयकात नमूद केल्यानुसार ‘विशिष्ट परिस्थितीत कामगारांनी जर संप व आंदोलने केली तर ती बेकायदा ठरवली जातील हे नमूद केले होते.’ यावरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ”संप करणे हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे. मनाच्या इच्छेविरुध्द त्याला काम करण्यास भाग पाडणे म्हणजे कामगाराला गुलाम बनविणे होय. संप म्हणजे कामगारांचा आपण कोणत्या अटीवर नोकरी करण्यास तयार आहोत, हे सांगावयाचे स्वातंत्र्य असलेला हक्क होय.
  • आज कामगारांची जी सुस्थिती आहे त्यामध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून बाबासाहेब हे सर्व कामगारांचे आदर्श आहेत. बाबासाहेबांनी निर्मित केलेले काही कामगार कायदे:
  • बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील मार्गदर्शक तत्वआर्टिकल ३९ (ड)  नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणार्‍या स्त्रियांनाही मिळावा अशी    घटनात्मक तरतूद केली.
  • १९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १०   तासांऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.
  •   अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून कामगार भरपाई कायद्याचीनिर्मिती केली.
  • कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. १४ एप्रील १९४४ ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले.
  •   आठ तास कामाची वेळ (Reduction in Factory Working Hours 8 hours duty)
  •  महिलांना प्रसूती रजा (Mines Maternity Benefit Act)
  • महिला कामगार वेलफेयर फंड (Women Labor welfare fund)
  •  महिला व बालकामगार संरक्षण कायदा (Women and Child, Labor Protection Act)
  • खाणकामगार यांना सुविधा (Restoration of Ban on Employment of Women On Underground Work in Coal Mines)
  • भारतीय फेक्टरी कायदा (Indian Factory Act) इ.


अशा स्वरूपाच्या कित्येक कायद्यांची व बिलांची निर्मिती डॉ. आंबेडकरांनी कामगारांचे हित जोपासण्यासाठी केली.  

अशा या ‘महाराष्ट्र दिनी’ व ‘कामगार दिनी’ ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व महाराष्ट्र अर्थातच देश घडवण्यामध्ये कामगार म्हणून मोलाचा वाटा उचलत आहेत अशा सर्वांना ‘महाराष्ट्र दिनी’ व ‘कामगार दिनी’ हार्दिक अभिवादन.

उत्तम मदने
०१.०५.२०२०