About me

Monday, 6 July 2020

Book Review: Book Name - विवेकी पालकत्व

Book Review

उत्तम मदने

डॉ. अंजली जोशी लिखित विवेकी पालकत्व हे एक खूपच सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात लेखिकेने पाल्य आणि पालक यांचे नाते संबंध कसे असावेत, आणि ते कसे विकसित केले जाऊ शकतात, यासंदर्भात खूप सुंदर मांडणी केलेली आहे. या मांडणीमध्ये लेखिकेने वेगवेगळ्या सिच्युएशन दिलेल्या आहेत, आणि त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये पालकांनी आपल्या मुलांशी कसं वागलं पाहिजे, मुलांना कसं समजून घेतलं पाहिजे यासंदर्भात विचारांची छाननी केली  आहे. 

या पुस्तकात लेखिकेने प्रामुख्याने विवेकी पालकत्व म्हणजे काय असतं? आपण पालक म्हणून मुलांकडून किती अपेक्षा ठेवल्या पाहिजेत? आणि कोणत्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत? पालक म्हणून आपली भूमिका काय असते? जेव्हा मुलांचे बाबा मुलांप्रमाणे लहान होतात या परिस्थितीमध्ये पालकांचं मुलांबरोबर वागणं, मुलांना पराजयाचा सामना करायला कसं शिकवलं पाहिजे, रागावर कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे, मुलांची न्यूनगंडातून सुटका कशी करता येईल किंवा न्यूनगंड कसा निर्माण होणार नाही, आणि पालकांना जर एकच  मूल असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, बऱ्याचदा पालक आणि मुलं यांच्यातील संवाद थांबतो त्या परिस्थितीत काय केले पाहिजे, बऱ्याचदा मुलांचा काही परिस्थितीमुळे भावनिक उद्रेक होत असतो त्यावरती कसं नियंत्रण मुलांनी आणलं पाहिजे, पालक म्हणून किंवा समाज म्हणून मुलांवरती जी  शिक्के-बाजी  केली जाते त्याचा मुलांवरती काय परिणाम होतो, बऱ्याचदा मुलांना किंवा पालकांना वैफल्यला तोंड द्यावे लागते, असे वैफल्य ओढवल्यानंतर ते कसं पचवल पाहिजे, आई-वडिलांमधील मतभेदाचा मुलांवरती काय परिणाम होतो, मुलांना नैतिकता कशी शिकवली पाहिजे किंवा नैतिकता शिकवताना कोणत्या गोष्टी मुलांसोबत चर्चिल्या पाहिजेत, बऱ्याचदा अशी परिस्थिती दिसून येते की मुलांमध्ये खूप साऱ्या क्षमता दिसतात आणि यश कमी मिळतं असं का होतं, वैचारिक अपंगत्व कसे येत आणि यामध्ये पालकांच्या भूमिका काय असतात, युवा अवस्थेत मुलांचं वागणं कसं असतं आणि त्यांच्या समोरील आव्हाने कोणती असतात, तसेच आजी-आजोबांचं कडून मुलांचं संगोपन करून घेणे किंवा किंवा मुलाची जास्तीत जास्त जबाबदारी आजी-आजोबांकडे देणे याकडे मुलाचे पालक म्हणून आपण कसं पाहिलं पाहिजे, अशा बर्‍याच गोष्टींवर लेखिकेने या पुस्तकात चर्चा केली आहे. 

या चर्चेमध्ये लेखिकेने मुलांच्या संदर्भात तिच्या अनुभवातून काही सिच्युएशन मांडलेल्या आहेत. या पुस्तकामध्ये या सिच्युएशन पाल्य आणि पालक यांच्या संदर्भात आहेत परंतु जी विचारांची मेथोडोलॉजी डिस्कस केलेली आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू शकतो. मंग, जी सिच्युएशन किंवा परिस्थिती मांडलेली आहे ती सिच्युएशन किंवा परिस्थिती का निर्माण झाली. हि परस्थिती निर्माण होण्यासाठी बाह्य गोष्टी कारणीभूत आहेत की अंतर्भूत गोष्टी कारणीभूत आहेत यासंदर्भात मांडणी केली आहे. बऱ्याचदा आपल्या मनाची जी परस्थिती निर्माण झालेले असते त्याला आपले विचारच कसे कारणीभूत असतात याचं खूप उत्तम पद्धतीने विवेचन केलेल आहे. बऱ्याच वेळा काही तरी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या संदर्भात घडलेल असतं आणि त्यामुळे आपण खूप नाराज, निरास अशा परिस्थितीमध्ये गुरफटून जातो, मग हि आपल्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती खरंच त्या घडलेल्या घटनेमुळे ओढवले आहे की त्या घडलेल्या घटने संदर्भात आपण आपल्या विचारांची कोणती प्रक्रिया ठेवली आहे किंवा त्या संदर्भात आपण कशाप्रकारे विचार केलेला आहे याच्यातून हि मनाची परिस्थिती तयार झालेली आहे याचे खूप चांगल्या पद्धतीने विवेचन केलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये, आपण पालक म्हणून त्या गोष्टीची कशी छाननी केली पाहिजे, पाल्य म्हणून त्या गोष्टीची कशी छाननी   केले पाहिजे. तसेच आपल्या मनामध्ये अविवेकी विचार का जागृत होतात आणि या अविवेकी विचारांमुळे आपल्या मनावर किती मोठा परिणाम होत असतो आणि त्याची खूप मोठी किंमत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मोजावी लागते, मग अश्या अविवेकी विचारांपासून दूर जाण्यासाठी आपण आपली विचार प्रक्रिया कोणत्या पद्धतीने विकसित केली पाहिजे याचे खूप चांगले विवेचन केलेले आहे. 

अशाप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये घटणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे, त्या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे, मनामध्ये निर्माण होणाऱ्या अविवेकी विचारांना विवेकी विचारांमध्ये परावर्तित करण्यासाठी आपण आपल्या विचारांची कोणती प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक गोष्टीची छाननी कोणत्या पद्धतीने केले पाहिजे, छाननी केल्यानंतर आपल्यासमोर खूप सारे पर्याय येतात तेव्हा योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी आपण कोणत्या वैचारिक प्रक्रियेतून जाणे गरजेचे आहे, यासंदर्भातील भन्नाट मेथोडोलॉजी या पुस्तकात दिलेली आहे. सर्वांनी वाचावं अशा पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे. 

उत्तम मदने
जुलै ४, २०२० 

2 comments:

Please give your valuable comment on the write-up and Share it on Whatsapp, Facebook, Twitter, etc. / कृपया लेखनावर आपली मौल्यवान टिप्पणी द्या आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी वर शेर करा.